मुंबई – अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंड केलं. ते राष्ट्रवादीच्या आठ बड्या नेत्यांसह शिवसेना, भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यांनी रविवारी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी 8 नेत्यांसोबत शपथ घेतल्यानंतर शरद पवार हे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. आम्ही महाविकास आघाडीसोबतच असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
या सर्व घडामोडींनंतर आणि राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर आज राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचा दिवस आहे. आज अजित पवार आणि शरद पवार गटाकडून मुंबईमध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान, या बैठकीत भाषण करताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला आपल्या भाषणातून चांगलंच सुनावलं आहे.
तसेच, ‘माझे फोटो माझ्या परवानगीनेच वापरावेत. जिवंतपणी माझा फोटो कुणी वापरावा हा माझा अधिकार आहे.’ यावर देखील शरद पवार यांनी भाष्य केल्याचं दिसून आलं आहे. शरद पवार म्हणाले, “जे माझा फोटो लावतात, त्यांना माहिती आहे की त्यांचं नाणं चालणार नाही. मला पांडूरंग म्हणायचं आणि आमच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं असं सांगायचं असा कार्यक्रम काहींनी सुरू केल्याचं दिसून येत आहे. असं पवार म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, “ठिक आहे, तुम्ही सांगू शकता. निवडणूक आयोगाने घड्याळाची खूण कुणाला दिली? ही सगळ्या देशाला माहिती आहे. तुमच्यासाठी सांगतो, कोण कुठे जाणार नाही, हा पक्ष आमचा. ही घड्याळाची खूण आमची आहे. बैलजोडीवर लढलो, हातावर लढलो, चरख्यावर लढलो, गाय-वासरुवर लढलो, घड्याळवर लढलो. कशात काही कमतरता नाही.
त्यामुळे कुणी काही सांगत असेल की चिन्ह आम्ही घेऊन जाऊ. चिन्ह जाणार नाही. जाऊ देणार नाही. पण चिन्ह घेऊन जात असाल तर कोणतंही चिन्ह असूद्या, जोपर्यंत सामान्य माणसाच्या अंतकरणात त्या पक्षाचा विचार आहे तोपर्यंत काही चिंता करण्याचं कारण नाही..’ असं शरद पवार यावेळी म्हणाले.