लोणी काळभोर – हिरकणीने आपल्या तान्ह्या बाळासाठी रायगडाचा दरवाजा सायंकाळी बंद झाल्यानंतर अत्यंत अवघड टप्पा उतरून, ज्या ठिकाणाहून फक्त पाण्याचा प्रवाहच खाली जाऊ शकतो अशी वाट उतरून तिच्या घरी पोहोचली.
आज रायगडाच्या या वाटेला हिरकणी बुरुज म्हणून ओळखले जाते. साडेतीनशे वर्षांपूर्वी अशा रणरागिनी आपल्या स्वराज्यात होत्या. आज मुलांबरोबर मुलींना ही समान वागणूक दिली जात आहे. सह्याद्रीच्या कड्याकपारीत रणरागिणी स्वच्छंद भटकंती करताना विविध गडांवर, मोहिमेवर सहभागी होत आहेत. अशाच एका रणरागिणीने एक अद्भूत व अविस्मरणीय अशी कामगिरी केली आहे. स्वानंदी सचिन तुपे (वय 9) हे तिचे नाव आहे. ती कुंजीरवाडी (ता. हवेली) येथे राहत असून एमआयटीमध्ये चौथ्या इयत्तेमध्ये शिकत आहे.
तिने आत्तापर्यंत सह्याद्री रांगेतील अनेक गड-किल्ले सर केले आहेत. लिंगाणा गड हा अत्यंत अवघड श्रेणीतील समजला जाणारा गड तिने सर केला आहे. तिचे वडील सचिन तुपे व काका पंडित झेंडे यांच्या बरोबर तिची भटकंती सुरू असते. खिरेश्वर येथून सोमवारी (दि. 9) सायंकाळी 6 वाजता तिने हरिश्चंद्रगड चढण्यास सुरुवात केली. रात्री 9.30 वाजता ती गडावर पोहचली. तेथे रात्रीचा मुक्काम करून दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि. 10) पहाटे कोकण कड्यावर पोहोचली. सकाळी नऊ वाजता ती व तिचे वडील सचिन तुपे यांनी कोकणकड्या वरून रॅपलिंग करायला सुरुवात केली.
पहिला 900 फुटांचा टप्पा पार करायला तिला अर्धा तास लागला. हा टप्पा पूर्ण ओव्हरहॅन्ग म्हणजे लटकत खाली जावे लागते. त्यानंतर दुसरा टप्पा हा 600 फुटांचा आहे. तो तिने दहा मिनिटांत पार केला. हा ही टप्पा थोडा ओव्हरहॅन्ग आहे. तिसरा टप्पा 300 फुटांचा आहे. हा टप्पा सोपा आहे, तिने आठ मिनिटांत पार केला. येथून पुढे खरी कसरत चालू झाली. येथून बेलपाडापर्यंत जाणारी वाट अतिशय अवघड अशी आहे. वाटेमध्ये मोठ्या दगडांची वाट पार करून जावे लागले.
रस्ता असा नाहीच, दगडांवर अंदाजे पाय ठेवून जिथे वाट दिसेल तेथे पाय रोवून जावे लागते. अतिशय कष्टदायक व सत्वपरीक्षा पाहणारी वाट चालून जवळपास साडेपाच तासांचे पदभ्रमण करून रात्री साडेनऊ वाजता बेलपाडा येथे पोहोचली. या मोहिमेचे आयोजन अनिल वाघ यांनी केले होते. दीपक विशे, गणेश गायकवाड यांनी सहकार्य केले. एकूण दहा सदस्यांनी कोकण कडा हा 1800 फुटांचा टप्पा रॅपलिंग करीत पार केला. पंडित झेंडे हे सुद्धा या मोहिमेत सहभागी झाले होते. अवघ्या नऊ वर्षाची हिरकणी स्वानंदी सचिन तुपे हिने न भूतो न भविष्यती अशी मोहीम पार पाडली आहे. या ठिकाणी प्रथमच नऊ वर्षांच्या मुलीने 1800 फुटांचे रॅपलिंग केले आहे.