Hinjawadi News : हिंजवडीतील ‘त्या’ मृतदेहाचे रहस्य उलगडले

पिंपरी : चादरीमध्ये गुंडाळलेला एक मृतदेह असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता गुन्हे शाखेचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी चादरीत गुंडाळलेला तो मृतदेह उलगडला आणि सर्वांनीच डोक्याला हात लावला. कारण तो मृतदेह मनुष्याचा नसून कुत्र्याचा असल्याचे निष्पन्न झाले. ही घटना बुधवारी (दि. १८) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास शिंदे वस्ती येथे चादरीत गुंडाळलेल्या अवस्थेत एक मृतदेह असल्याची माहिती मिळाली. हा नक्की खुनाचा प्रकार असल्याची खात्री पोलिसांना वाटत होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेची पथकेही घटनास्थळी दाखल झाली.
चादरीत गुंडाळलेल्या ‘त्या’ मृतदेहाचे फोटो काढण्यात आले. थोडी दुर्गंधीही येत होती. त्यानंतर पुढील पंचनामा करण्यासाठी चादर उलगडण्यात आली. त्यावेळी चादरीमध्ये मनुष्याचा नव्हे तर कुत्र्याचा मृतदेह आढळून आला. यामुळे उपस्थित असलेल्या सर्वांनी डोक्याला हात लावला. या घटनेमुळे अनेकांना ‘दृश्यम’ चित्रपटाचीही आठवण झाली.





