हिंगोली: गुंडा येथील ओढ्याच्या पाण्यात वाहून जाऊन दोन महिलांचा मृत्यू

हिंगोली- हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील गुंडा येथे शुक्रवारी (दि. १२ सप्टेंबर) दुपारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने हाहाकार उडवला. या पावसामुळे थुना नदीच्या ओढ्याला पूर आला आणि शेतातून घरी परतणाऱ्या दोन महिलांचा पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून जाऊन दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये गयाबाई अंबादास सारोळे (वय ६०) आणि सखुबाई विश्वनाथ भालेराव (वय ५५) यांचा समावेश आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी दुपारपासून सुरू झालेल्या धुवाँधार पावसाने नदी-नाल्यांना पूर आले. याचा सर्वाधिक फटका वसमत तालुक्याला बसला असून, काकबन, रिधोरा आणि गुंडा या भागातील रस्ते बंद झाल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. हिंगोली आणि कळमनुरी तालुक्यातही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
घटना घडली तेव्हा गयाबाई आणि सखुबाई या दोन्ही महिला हळद निंदणीसाठी शेतात गेल्या होत्या. काम आटोपून दुपारी घरी परतत असताना वाटेतील थुना नदीच्या ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्याचा त्यांना अंदाज आला नाही. परिणामी, दोघीही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या. शुक्रवारी रात्रीपर्यंत गावकऱ्यांनी शोधमोहीम राबवली, मात्र त्यांचा शोध लागला नाही. शनिवारी सकाळी घटनास्थळापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर पुण्यामधील गाळात त्यांचे मृतदेह आढळून आले.
गयाबाई यांच्या पश्चात एक मुलगा आणि तीन मुली, तर सखुबाई यांच्या पश्चात एक मुलगा आणि दोन मुली आहेत. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.





