Hingoli: (शिवशंकर निरगुडे) – हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील डोंगराळ भागातील घोरदरी गावातील दोन युवकांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यश संपादन करत पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर झेप घेतली आहे. ज्ञानेश्वर दत्तराव पायघन आणि अमोल माणिक पवार यांची एमपीएससी परीक्षेतून PSI पदी निवड झाली असून, त्यांच्या यशाने संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. निकाल जाहीर होताच ग्रामस्थांनी डीजेच्या गजरात दोघांचे जंगी स्वागत केले. जिल्हा परिषद शाळेतून सुरू झालेला प्रवास – ज्ञानेश्वर पायघन यांचे प्राथमिक शिक्षण घोरदरी येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. पुढील शिक्षण चिंचांबा येथील भारत माध्यमिक विद्यालयात पूर्ण करून त्यांनी परभणी येथे उच्च माध्यमिक शिक्षण घेतले. 2014 साली त्यांची अकोला येथे पोलीस कॉन्स्टेबल पदावर निवड झाली. त्यानंतर 2021 मध्ये हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेत (LCB) कार्यरत असताना त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. नोकरीसोबत अभ्यास; जिद्दीला यश – पोलीस दलातील जबाबदाऱ्या सांभाळत असतानाच पायघन यांनी PSI होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अभ्यास सुरू ठेवला. ड्युटी आणि अभ्यास यांचा समतोल साधत त्यांनी 2023 मध्ये एमपीएससी परीक्षा दिली आणि अखेर यश मिळवले. त्यांच्या या यशामागे पत्नी सौ. ज्योती पायघन यांचे पाठबळ तसेच आई-वडिलांचे आशीर्वाद महत्त्वाचे ठरले. गावाचा वाढता लौकिक – घोरदरी या छोट्याशा गावाने यापूर्वीही अनेक अधिकारी घडवले असून, आतापर्यंत सुमारे 25 ते 30 युवक विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. पोलीस दल, वैद्यकीय, कृषी आणि शिक्षण क्षेत्रात गावातील युवकांनी आपली छाप सोडली आहे. पायघन आणि पवार यांच्या यशामुळे घोरदरी गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.