हिंगोली: ओबीसी आंदोलकांचा औंढा-जिंतूर महामार्गावर रास्ता रोको; मराठा आरक्षणासंदर्भातील GR रद्द करण्याची मागणी

हिंगोली – शासनाने मराठा आरक्षणाच्या संदर्भात काढलेला अध्यादेश रद्द करावा, या मागणीसाठी सकल ओबीसी समाजाच्या वतीने औंढा नागनाथ ते जिंतूर मार्गावरील येळी फाटा येथे शुक्रवारी (ता. 5) रास्ता रोको करण्यात आला. तीन तास चाललेल्या या आंदोलनात वाहतूक ठप्प झाली होती. राज्य शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात काढलेला अध्यादेश रद्द करावा, अशी मागणी सकल ओबीसी समाजाच्या वतीने करण्यात आली. या मागणीसाठी समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अध्यादेशाची होळी करून निषेध व्यक्त केला होता. त्यानंतर या मागणीसाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता.
दरम्यान, शासनाने अध्यादेश रद्द करण्याचे मागणीसाठी आज औंढा नागनाथ जिंतूर मार्गावर येळी फाटा येथे ओबीसी समाज बांधवांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार सकाळी अकरा वाजल्यापासून ओबीसी बांधव येळी फाटा येथे एकत्र आले. यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शासनाने काढलेला अध्यादेश तातडीने रद्द करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आज सकाळी 11:00 वाजल्यापासून सुरू झालेला रास्ता रोको दुपारी दोन वाजता मागे घेण्यात आला. यावेळी अॅड रवी शिंदे, चंदू लव्हाळे, नागोराव जांबुतकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या आंदोलनामुळे औंढा नागनाथ ते जिंतूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. औंढा नागनाथ व जिंतूर या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
यावेळी अॅड. शिंदे, चंदू लव्हाळे, नागोराव जांबुतकर, जयश्री सातव, वनिता गुंजकर, ज्योती दिघडे, सिंधू जांबुतकर यांच्या शेकडो ओबीसी बांधव उपस्थित होते. आंदोलन काळात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक जी. एस. राहिरे, उपनिरीक्षक शेख खुद्दूस, जमादार रविकांत हरकाळ, संदीप टाक यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.





