हिंगोली: रेल्वेच्या धडकेत निलगाय उडून थेट विजेच्या तारेवर अडकली

हिंगोली – वसमत पूर्णा-अकोला रेल्वे मार्गावर जुनोना रेल्वेस्थानकाजवळ अचानक रुळावर आलेल्या नीलगायीला रेल्वेची जोराची धडक बसली. ही धडक एवढी जोराची होती की नीलगाय हवेत उडून थेट रेल्वेच्या विद्युत वाहिनीवर अडकली. २० फेब्रुवारी रोजी सकाळी ही घटना घडली. या प्रकारामुळे पूर्णा-अकोला रेल्वे मार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती. गुरुवारी सकाळी पूर्णा-अकोला- पूर्णा ही रेल्वे अकोल्याकडे जात असताना ही घटना घडली.
घटनेनंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी क्रेनच्या साहाय्याने विद्युत वाहिनीवर अडकलेल्या नीलगायीस खाली काढले. त्यानंतर पूर्णा येथून निघालेली रेल्वे अकोल्याकडे रवाना झाली. पूर्णा ते अकोला व अकोला ते पूर्णा अशी रेल्वे क्रॉसिंग हिंगोली येथे नियमित होत असते. गुरुवारी ही रेल्वे क्रॉसिंग बोल्डा रेल्वेस्थानकावर झाली. तसेच या मार्गावरील रेल्वेगाड्या दीड ते दोन तास उशिराने धावल्या. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.
या मार्गावर नेहमी अपघात घडतात. पूर्णा ते अकोला रेल्वे मार्गावर अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच या मार्गावर रेल्वेच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. लहान-मोठे वन्यप्राणीही रेल्वेला धडकून मृत्युमुखी पडत आहेत.





