हिंगोली (शिवशंकर निरगुडे) – केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी ‘हर घर नळ, जलजीवन मिशन’ योजना ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला २०२४ पर्यंत नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी राबवली जात आहे. या योजनेचा मुख्य उद्देश महिलांच्या पाण्यासाठी होणाऱ्या भटकंतीचा आणि त्रासाचा अंत करणे हा आहे. योजनेअंतर्गत प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणी देऊन प्रति व्यक्ती ५५ लिटर शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र, हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये ही योजना अद्यापही पूर्णत्वास गेलेली नाही. यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी अजूनही दूरवर भटकावे लागत आहे. विशेषतः हिंगोली तालुक्यातील सिरसम बु.(बुद्रुक) गावातील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. या गावात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपयांचा खर्च करून नळयोजना राबवण्यात आली आहे. तरीही आजपर्यंत गावात पाण्याचा एकही थेंब पोहोचलेला नाही. उन्हाळा जवळ येत असतानाच गावात पाणीटंचाई तीव्र झाली आहे. यामुळे संतप्त झालेल्या शेकडो महिलांनी मंगळवारी डोक्यावर हंडे घेऊन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले. महिलांनी आणि ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी केली. “कलेक्टर साहेब, आमदार साहेब जागे व्हा.. जागे व्हा..! सिरसम गावाला पाणी उपलब्ध करून द्या.. पाणी.. पाणी..!” आंदोलन इतके तीव्र झाले की, संतप्त महिलांनी पोलिसांचा विरोध झुगारून जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला आणि राहुल गुप्ता यांच्या दालनासमोर घेराव घातला. परिसर दणाणून गेला होता. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला आणि सिरसम बु. गावाला तात्काळ पाण्याची व्यवस्था करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतरच आंदोलन शांत झाले. ग्रामस्थांनी सांगितले की, योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात निधी खर्च झाला तरी प्रत्यक्ष काम पूर्ण झालेले नाही. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही दुर्लक्ष होत असल्याने हे आंदोलन करावे लागले. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून ही योजना राबवली जात असली तरी अंमलबजावणीतील कमतरतेमुळे ग्रामस्थ त्रस्त आहेत. या घटनेमुळे हिंगोली जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.