Hingoli News : टिप्परच्या धडकेत भावांचा मृत्यू; हिंगोलीच्या कोपरवाडी शिवारातील घटना

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील कोपरवाडी शिवारात भरधाव टिप्परने धडक दिल्याने झालेल्या अपघातात कुपटी येथील दोन सख्या भावाचा मृत्यू झाला तर चौघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी ता. 18 रात्रीच्या सुमारास घडली आहे. जखमींना उपचारासाठी आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी टिप्पर व चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील कुपटी येथील मुळचे रहिवासी असलेले संतोष माहोरे हे मागील काही वर्षापासून पुणे येथे राहतात. त्या ठिकाणी खाजगी कंपनीमध्ये ते काम करतात. हिंगोली येथे नातेवाईकांच्या विवाह सोहळ्यासाठी माहोरे कुटुंबिय हिंगोलीत आले होते. त्यानंतर त्यांची मुले अरुण संतोष माहोरे (18), अनिकेत संतोष माहोरे (17) हे त्यांचा मित्र अनिकेत मुळे यांच्यासह कोपरवाडी येथे आजी आजोबांना भेटण्यासाठी गेले होते.
दरम्यान, रविवारी ता. 18 रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ते गावाजवळ थांबले असतांना रामेश्वरतांडा येथून तलावातील काळीमाती घेऊन कोपडवाडीकडे निघालेले टिप्पर कोपरवाडी येथील आबादानी येथे आले असतांना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले या अपघातात टिप्परची रस्त्याच्या बाजूला असलेल्या सहा जणांना धडक बसली. या अपघातात सर्व सहा जण जखमी झाले. यामध्ये अनिकेत माहोरे (17), गजानन मुकाडे (18), संदीप मारकड (21), अरुण माहोरे (18), वैभव डुकरे (18), अनिकेत मुळे (18), यांचा समावेश आहे.





