Hingoli News : हिंगोलीत शरद पवारांना मोठा धक्का ! अनिल पतंगे हाती घड्याळ बांधणार

हिंगोली : हिंगोलीच्या राजकारणातही एका मोठ्या उलथापालथीचे चित्र स्पष्ट होत आहे. शरद पवार यांचे निष्ठावान समर्थक म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल पतंगे आता शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्या गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.ते लवकरच अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असून, यामुळे शरद पवार पक्षाला हिंगोलीत मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
हा पक्षप्रवेश सोहळा 8 जून रोजी सेनगाव येथे होणार असून, त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार खास हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या कार्यक्रमात सेनगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांसह अनेक नगरसेवक व ग्रामीण भागातील पदाधिकारी देखील शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याबाबत बोलताना अनिल पतंगे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, ‘सेनगाव नगरपंचायतीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, हजारो कार्यकर्त्यांसह आम्ही आठ तारखेला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहोत. सेनगाव येथे हा पक्ष प्रवेश सोहळा कार्यक्रम पार पडणार आहे.’ या पक्ष प्रवेश सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवळ, तसेच आमदार राजू नवघरे यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.





