हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात महायुती व आघाडीमध्ये राजकीय उलथापालथ सुरुच असून काँग्रेसच्या माजी जिल्हाध्यक्षाने भाजपात प्रवेश केल्याने काँग्रेसला धक्का बसला आहे. त्या पाठोपाठ आता पुढील आठवड्यात सेनगाव तालुक्यातील शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश होणार आहे. त्यामुळे काकांच्या राष्ट्रवादीला धक्का बसणार आहे. हिंगोली जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राजकीय हालचालींना वेग आला आहे. हिंगोली, कळमनुरी, वसमत नगर पालिकांसोबतच जिल्हा परिषद व पंचायत समिती ताब्यात घेण्यासाठी राजकीय पक्षांच्या जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यातून मातब्बरांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन पक्ष बळकटीकरण केले जात आहे. मागील दोन दिवसांपुर्वीच भाजपाच्या वतीने आयोजित शेतकरी मेळाव्यात काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई यांचा भाजपामध्ये प्रवेश झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे कळमनुरी तालुक्यात भाजपाला चांगलेच बळ मिळणार आहे. त्यानंतर आता सेनगाव तालुक्यातील राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अनिल पतंगे यांच्यासह त्यांचे समर्थक राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यासाठी पुढील आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सेनगाव येथे दौरा होणार आहे. यावेळी आयोजित कार्यक्रमात पतंगे यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल पतंगे यांच्या राष्ट्रवादीच्या अजित दादा गटात प्रवेशामुळे राष्ट्रवादीला मोठे बळ मिळणार आहे. त्यांच्या प्रवेशाने सेनगाव तालुक्यातील राजकीय समिकरणे बदलणार असून सेनगाव तालुक्यातून जास्तीत जास्त जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य निवडून आणण्याची रणनिती आखली जात आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार राजेश नवघरे, रामदास पाटील सुमठाणकर, जिल्हाध्यक्ष बी. डी. बांगर यांनी पुढाकार घेतल्याचे बोलले जात आहे.