Hingoli News : आरक्षणापायी आणखी एका तरुणाचा बळी; कुटुंबीयांकडून मन हेलावून टाकणारा आक्रोश

हिंगोली : हिंगोलीमधून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. या ठिकाणी एका तरुणाने ओबीसी आरक्षणासाठी आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. संतोष शिवाजी कागणे (वय वर्ष २७) असे आत्महत्या करणाऱ्या तरूणाचे नाव आहे. त्याने बारावीपर्यंत शिक्षण घेतलं होतं. तो नोकरीच्या शोधात होता.मात्र त्याला नोकरी मिळत नव्हती. तो ओबीसी आरक्षणाच्या आंदोलनात सक्रीय सहभागी होता, अशी माहिती संतोषच्या कुटुंबियांकडून देण्यात आली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार संतोष हा हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील सेलसुरा गावातील रहिवासी होता. त्याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले होते. तो नोकरीच्या शोधात होता मात्र त्याला नोकरी मिळत नव्हती. तसेच संतोष ओबीसी आरक्षणाच्या आंदोलनातही सहभाग घ्यायचा, अशी माहिती त्याच्या कुटुंबियांकडून देण्यात आली आहे.
कुटुंबीयांचा आक्रमक पवित्रा
संतोषने ओबीसी आरक्षणासाठी आयुष्य संपवलं आहे. त्याला न्याय देण्यासाठी कुटुंबासह गावातील नागरिक एकवटले आहेत. कुटुंबियांनी संतोषच्या मृतदेहाला अग्नी दिली नाही. त्यांनी मृतदेह कळमनुरी तहसील कार्यालयाच्या परिसरात आणून ठेवला आहे. ‘ओबीसी आरक्षण संपविण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरकारने उत्तर द्यावं, तेव्हाच मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी घेऊन जाऊ’; अशी मागणी कागणे कुटुंबियांकडून करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.





