Hingoli News : गोळीबारात जखमी झालेल्या लेकापाठोपाठ आईचाही मृत्यू

हिंगोली : पोलिस कर्मचाऱ्याने केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या सासूचा उपचार सुरु असताना, सोमवारी 30 रोजी सायंकाळी मृत्यू झाला. यामुळे या घटनेतील मृतांची संख्या आता 3 झाली आहे. रविवारी या घटनेतील योगेश धनवे यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सोमवारी त्यांच्या आई वंदना धनवे यांनीही उपचारादरम्यान प्राण सोडले.
वसमत शहर पोलिस ठाण्यातील कर्मचारी विलास मुकाडे याने 25 डिसेंबरला रात्री, हिंगोलीत सासुरवाडीला येऊन गोळीबार केला. यामध्ये त्याची पत्नी मयुरी मुकाडे यांचा जागीच मृत्यू झाला होता. मृत वंदना धनवे यांचे पती प्रसाद धनवे हे राज्य राखीव दलात कार्यरत होते. कर्तव्यावर असतांनाच त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या जागेवर वंदना धनवे यांना कक्ष सेविका या पदावर नोकरी मिळाली.
नोकरी करून त्यांनी योेगेश व मुलगी मयुरीयांचा सांभाळ केला होता. आरोपी विलास व मयुरी मुकाडे यांना श्रीयांश हा 3 वर्षाचा मुलगा आहे. त्याच्या आईचा मृत्यू झाला, तर वडील तुरुंगात आहेत. आजी व मामाचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्याचा सांभाळ कोण करणार असा प्रश्न आहे.





