हिंगोली: खडकी येथे महावितरणच्या कंत्राटी कामगाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील खडकी येथे महावितरणच्या कंत्राटी कामगाराचा विजेच्या जोरदार धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सखाराम शिरसागर (वय ३५, रा. हिवरखेडा) असे मृत कामगाराचे नाव आहे.
महावितरणद्वारे मान्सूनपूर्व विद्युत दुरुस्तीचे काम सुरू आहे. बुधवारी (११ जून २०२५) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास खडकी गावात शिरसागर विद्युत खांबावर दुरुस्तीचे काम करत होते. काम सुरू करण्यापूर्वी त्यांनी डीपीवरील फ्यूज काढला होता. मात्र, अचानक कोणीतरी फ्यूज टाकल्याने विद्युत प्रवाह सुरू झाला आणि शिरसागर यांना जोरदार विजेचा धक्का बसला. यामुळे ते खांबावरून खाली कोसळले. त्यांच्या डोके आणि छातीला गंभीर दुखापत झाली.
स्थानिकांनी त्यांना तातडीने साखरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना हिंगोलीतील लक्ष्मी केअर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तिथून पुढील उपचारासाठी नांदेडला रेफर करण्यात आले, परंतु वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून गुरुवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शिरसागर गेल्या २-३ वर्षांपासून महावितरणमध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम करत होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा आणि दोन भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे हिवरखेडा गावात शोक व्यक्त होत आहे. महावितरणच्या निष्काळजीपणावर प्रश्न उपस्थित होत असून, पोलिस तपास करत आहेत.





