Hingoli : औंढा नागनाथ येथे पेढे विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
Hingoli : सात खव्याचे नमुने तपासणीसाठी जप्त; निकृष्ट दर्जाचा ९३ किलो साठा नष्ट

Hingoli : राज्यात सुरू असलेल्या ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने औंढा नागनाथ देवस्थान परिसरातील पेढे व मिठाई विक्रेत्यांवर धडक कारवाई केली. या कारवाईत निकृष्ट दर्जाच्या खव्याचे सात नमुने तपासणीसाठी जप्त करण्यात आले असून, अयोग्य पद्धतीने साठवून ठेवलेला सुमारे ९३ किलो खवा नष्ट करण्यात आला.
अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार ३ जुलै रोजी ही विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. प्राप्त तक्रारींच्या आधारे देवस्थान परिसरातील १० मिठाई विक्री आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यावेळी अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार परवाने, नोंदणी, स्वच्छता आणि अन्नपदार्थांच्या गुणवत्तेची पडताळणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान वैध अन्न नोंदणी अथवा परवाना नसलेल्या मिठाई विक्रेत्यांना व्यवसाय बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच संशयित दर्जाच्या खव्याचे सात नमुने प्रयोगशाळेतील विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत.
या तपासणीत औंढा नागनाथ येथील अनेक व्यावसायिक वसमत येथील विक्रेत्यांकडून खवा खरेदी करून विक्री करत असल्याचेही उघड झाले. त्यानुसार वसमत येथेही विशेष पथक पाठवून पुढील तपास व कारवाई सुरू करण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
ही कारवाई सहायक आयुक्त श्री. खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी तुषार घोपे, श्रीमती सावंत, वैभव ठोंबरे आणि कृष्णा मुळे यांनी केली. नागरिकांनी सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थांचीच खरेदी करावी तसेच अन्नपदार्थांबाबत कोणतीही तक्रार असल्यास ती तातडीने अन्न व औषध प्रशासनाकडे नोंदवावी, असे आवाहन छत्रपती संभाजीनगर विभागाचे सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी केले आहे.





