हिंगोली : वीज पडून शेतकरी महिलेचा मृत्यू, पती गंभीर जखमी; रक्षाबंधनदिवशी साखरा गावावर शोककळा

हिंगोली – जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील साखरा येथे सोमवारी (19 ऑगस्ट 2024) रोजी दुपारी सव्वा तीन वाजता वीज कोसळून शेतकरी महिला साबुबाई रघनाथ कांदे (वय 55 वर्ष) यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचे पती रंगनाथ वामन कांदे (वय 60 वर्षे) हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी हिंगोली येथे नेण्यात आले आहे.
सदर महिला व पती हे शेतामध्ये काम करत असताना पाऊस चालू झाला. यावेळी आडोशाकरिता शेतामधील शेडकडे जात असताना अचानक वीज कोसळली. सदर महिला व पतीला प्राथमिक आरोग्य केंद्र साखरा येथे आणले असता महिलेचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले, तर त्यांचे पती रंगनाथ वामन कांदे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचाराकरता हिंगोली येथे पाठविण्यात आले.
या घटनेचा पंचनामा साखरा सज्जाचे तलाठी पठाण यांनी केला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. रक्षाबंधनच्या दिवशी अशी घटना घडल्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.





