हिंगोली: घोरदरी येथील शेतकरी पुराच्या पाण्यात गेला वाहून, ३६ तासांनंतर सापडला मृतदेह

हिंगोली – सेनगाव तालुक्यातील घोरदरी गावात पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह तब्बल ३६ तासांनंतर आढळून आला. धोंडीराम भगवान घोगरे (वय ३५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
१६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास धोंडीराम हे घोरदरी गावातून शेताकडे जात असताना गावाच्या मध्यभागी असलेली नदी पार करत होते. मात्र, पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने ते वाहून गेले आणि बेपत्ता झाले. त्यांच्या शोधासाठी गावकऱ्यांनी तातडीने नदीपात्रात उतरून शोधमोहीम सुरू केली. १७ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास सेनगाव महसूल प्रशासनाचे अधिकारी आणि सेनगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मस्के यांच्या नेतृत्वाखालील पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनीही नदीपात्रात उतरून शोधमोहीम राबवली, परंतु रविवारी दिवसभराच्या प्रयत्नानंतरही धोंडीराम यांचा शोध लागला नाही.
अखेर, आज सकाळी (१८ ऑगस्ट ) ७ वाजण्याच्या सुमारास घोरदरी गावाजवळील पुलाच्या बाजूला धोंडीराम यांचा मृतदेह आढळून आला. नातेवाइकांनी मृतदेह पाण्याबाहेर काढला. त्यानंतर साखरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने शवविच्छेदन केले. शवविच्छेदनानंतर धोंडीराम यांच्यावर त्यांच्या मूळ गावी घोरदरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.





