हिंगोली: ढगफुटी सदृश्य पावसाने हिवरखेडा परिसरातील शेती पिकांचे अतोनात नुकसान

हिंगोली: हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात शुक्रवारी (दि. ०८ ऑगस्ट) सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हिवरखेडा, बोरखडी, पिंपळगाव, धोत्रा, खडकी, केलसुला, साखरा यासह परिसरातील अनेक गावांमध्ये या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे सोयाबीन, कापूस आणि हळद ही प्रमुख पिके जमीनदोस्त झाली आहेत. या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून, प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे.
हिवरखेडा येथील शेतकरी माधव लोकडी फुपाटे यांच्या शेतात नदीचे पाणी घुसल्याने त्यांचे संपूर्ण सोयाबीन पीक वाहून गेले आहे. त्याचप्रमाणे, बोरखडी-पिंपळगाव येथील शेतकरी हरी काळे यांच्या शेतातील सोयाबीन पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भागातील शेतकऱ्यांनी सांगितले की, पावसाच्या तडाख्यामुळे नद्या आणि नाले ओसंडून वाहू लागले, ज्यामुळे शेतातील पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली.
शेतकऱ्याची व्यथा:
हिवरखेडा येथील शेतकरी माधव फुपाटे यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले, “आज सकाळी ६ वाजल्यापासून ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. माझ्या शेताजवळील नदी काठ सोडून वाहू लागल्याने माझ्या एक एकरातील सोयाबीन पीक पूर्णपणे जमीनदोस्त झाले आहे. महसूल प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी माझी मागणी आहे.”
शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. यापूर्वीही सेनगाव तालुक्यातील बन, बरडा, पिंपरी येथे ढगफुटी सदृश्य पावसाने शेतीचे नुकसान झाले होते, तेव्हा प्रशासनाने पंचनामे केले होते. शेतकऱ्यांनी आता तातडीने कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे, जेणेकरून त्यांना आर्थिक आधार मिळू शकेल.
जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाने या नुकसानीची दखल घेऊन तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी शेतकरी आणि स्थानिक नेत्यांनी केली आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, सरकारने त्वरित मदत जाहीर करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.





