हिंगोली: येलदरी धरणाचे 10 दरवाजे उघडले, सेनगाव-जिंतूर-येलदरी मार्गावरील पूल पाण्याखाली, वाहतूक ठप्प

हिंगोली : गेल्या आठ दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे येलदरी आणि इसापूर धरणे १००% भरली आहेत. येलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस आणि खडकपूर्णा प्रकल्पातून वाढता विसर्ग यामुळे आज (दि. १८ ऑगस्ट) दुपारी १२:३० वाजता येलदरी धरणातून ५६,०६० क्युसेस पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. परिणामी, सेनगाव-जिंतूर-येलदरी मार्गावरील पूल पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. हा पूल ३५,००० क्युसेस विसर्गानंतर पाण्याखाली जाण्याची शक्यता असते, आणि सध्याच्या परिस्थितीत हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांचा संपर्क तुटला आहे.
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
वाढता विसर्ग आणि पाण्याचा प्रवाह लक्षात घेता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना नदीपात्रापासून दूर राहण्याचे आणि आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
पर्यटकांची वाढती वर्दळ
दरम्यान, येलदरी धरण परिसरातील निसर्गरम्य वातावरण आणि धरणाचे दृश्य पाहण्यासाठी हिंगोली, परभणी आणि आजूबाजूच्या भागातील पर्यटकांची मोठी गर्दी उसळली आहे. रविवारीसुद्धा (दि. १७ ऑगस्ट) दिवसभर पर्यटकांची वर्दळ दिसून आली. मात्र, वाढता पाण्याचा प्रवाह लक्षात घेता पर्यटकांनी सुरक्षितता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.





