ढाका : बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचार सुरूच असून एका हिंदू व्यक्तीला बळजबरीने विष पाजून मारण्यात आल्याची घटना उघड झाली आहे. जॉय मोहापात्रा असे हत्या करण्यात आलेल्या हिंदू व्यक्तीचे नाव आहे. गुरुवारी बांगलादेशातल्या सुनामगंज जिल्ह्यात ही घटना घडली. स्थानिक कट्टरवाद्यांनी मोहापात्रा यांना बेदम मारहाण केली आणि बळजबरीने विष पाजले, असे मोहापात्रा यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. मोहापात्रा यांना सेल्हेट माग ओस्मानी मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयातल्या अतिदक्षता विभागात दाखल केले गेले होते. तेथेच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा सविस्तर तपशील अजून उपलब्ध व्हायचा आहे. दोनच दिवसांपुर्वी चोरीच्या संशयावरून जमावाने मिथुन सरकार नावाच्या एका हिंदू तरुणाचा पाठलाग केला. स्वतःला वाचवण्यासाठी या २५ वर्षीय तरुणाने पाण्यात उडी मारली. पण बुडून त्याचा मृत्यू झाला होता. काही दिवसांपुर्वी दीपू चंद्र दास नावाच्या कापड उद्योगातील कामगाराला जमावाने इशनिंदेच्या आरोपाखाली बेदम मारहाण करून मारले होते. त्याचा मृतदेह झाडाला बांधून पेटून देण्याची अमानवी घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी यासिन अराफत या प्रमुख सूत्रधाराला अटक केली आहे. दास यांच्यावरील हल्ल्याचे नियोजन आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी देखील यानेच केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. इशनिंदेचा आरोप झाल्यावर दीपू चंद्र दास यांना त्यांच्या सुपरव्हायजरने राजीनामा देण्यास भाग पाडले होते. त्यानंतर जमावाने दास यांना मारहाण केली होती.