नवी दिल्ली- गेल्या अनेक दिवसांपासून शाहरुखचा ‘पठाण’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. पठाण चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यात चित्रित करण्यात आलेल्या दृश्यांवर आणि कपड्यांच्या रंगावर आता आक्षेप घेण्यात आला आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी आक्षेप घेतला आहे. वेशभूषा न बदलल्यास एमपीमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्याबाबत विचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण स्टारर पठाण हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच वादात सापडला आहे.
पठाणमधील ‘बेशरम रंग’ हे गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या गाण्यात दीपिका पदुकोण आणि शाहरुख खानच्या बोल्ड डान्स स्टेप्सला आणि भगव्या रंगाच्या कपड्यांचा वापर करण्यात आल्यामुळे ट्रोल केले जात आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी तर वेशभूषा न बदलल्यास चित्रपट प्रदर्शित होऊ द्यायचा की नाही याचा विचार करू, असे सांगितले आहे.
दरम्यान, आता चित्रपटातील हाच मुद्दा उपस्थित करत साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी ‘पठाण’ चित्रपटाला विरोध केला आहे. त्यांनी ट्विट करत एक व्हिडीओही शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी म्हटलंय, ‘चित्रपटातील बेशरम रंग गाण्यात हिंदूचा, भगव्याचा अपमान केला गेलाय त्यामुळे मी हिंदूंना आवाहन करते त्यांनी त्यांची कोणतीच फिल्म पाहू नका. जर हिंदूंचे रक्त तुमच्यामध्ये धावत असेल तर त्यांनी या चित्रपटाला तीव्र विरोध करावा आणि हा चित्रपट पाहायला जाऊ नये.” असं त्यांनी म्हंटलं आहे. सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून, यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.