नेवाशात आषाढी एकादशीनिमित्त हिंदू-मुस्लिम भाई-भाई

नेवासा, दि.25 (प्रतिनिधी)– संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पद्स्पर्शाने पुनित झालेल्या नेवासा नगरीत मुस्लिम बांधवांच्यावतीने बकरी ईदच्या दिवशी हिंदू धर्मियांचा आषाढी एकादशीला उपवास असल्याकारणाने यंदाच्या बकरी ईदच्या दिवशी मुस्लिम बांधवांकडून कुर्बानी न देण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुस्लिम बांधवांच्यावतीने शांतता समितीच्या बैठकीत जाहीर करण्यात आला. नेवासा शहरात पुन्हा एकदा हिंदू- मुस्लिम भाई-भाईचा नारा देण्यात आला.
आषाढी एकादशी आणि बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर नेवासा पोलीस ठाण्यात शांतता समितीची एक बैठक घेण्यात आली. नेवासा पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांच्या दालनात बैठक झाली. शांतता समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्यामुळे दोन्ही समाजातील मान्यवरांचे त्यांनी यावेळी कौतुक केले आहे.
या बैठकीला जातीय सलोखा समितीचे आसिफ पठाण, बहुजन चळवळीचे नेते संजय सुखदान ,युवा नेते ईमरान दारुवाला, नगरसेवक राजेंद्र मापारी, ज्येष्ठ नेते रहेमान पिंजारी, अब्बास बागवान, साईनाथ लष्करे, ऍड.जावेद ईनामदार, सुलेमान मणियार, मौलाना तन्वीर, यांच्यासह शांतता कमिटीचे सदस्य व शहरातील सर्वधर्मिय बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नुकतीच नेवासा पोलीस ठाण्यात गुप्तवार्ता विभागाची खांदेपालट करण्यात आली. मात्र, नवागडी गुप्तवार्ता विभागात हजर झाल्यामुळे दोन्ही समाजातील प्रतिष्ठीत नागरीक, माध्यमांच्या काही लोकांना निरोप देण्यात आला नाही. एकीकडे मुस्लिम समाजाने हा मोठा निर्णय घेण्यात येऊनही या बैठकीत काहींना डावलण्यात आल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात आली.





