Himanta Biswa Sarma : आसाम विधानसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचंड विजयानंतर, हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी मंगळवारी (१२ मे) दुसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली. यासह, ते आसामचे सलग दोन वेळा मुख्यमंत्रीपद भूषवणारे पहिले बिगर-काँग्रेस नेते ठरले आहेत. गुवाहाटीत आयोजित एका भव्य शपथविधी सोहळ्यात राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पदाची शपथ दिली. या सोहळ्याला (Himanta Biswa Sarma) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपशासित अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्रीही उपस्थित होते. हिमंता बिस्वा सरमा यांच्यासोबत ‘या’ नेत्यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली * रामेश्वर तेली * अतुल बोरा * चरण बोरो (बीपीएफ) * अजंता निओग एनडीए विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाल्यानंतर राज्यपालांनी रविवारी (१० मे) त्यांची मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली होती. आसाममधील एनडीए सरकारचा हा सलग तिसरा कार्यकाळ आहे. Himanta Biswa Sarma । यापूर्वी, २०१६ मध्ये सरबानंद सोनोवाल भाजपच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा मुख्यमंत्री (Himanta Biswa Sarma) झाले, तर २०२१ मध्ये हिमंता बिस्वा सरमा यांनी पदभार स्वीकारला. हा शपथविधी सोहळा अत्यंत विशेष मानला गेला. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासह एनडीए-शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित होते. हिमंता बिस्वा सरमा यांचा राजकीय प्रवास हिमंता बिस्वा सरमा यांनी २०१५ मध्ये काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी आसाममध्ये काँग्रेसचे वर्चस्व होते आणि भाजपचे फक्त पाच आमदार होते. मात्र, हिमंता शर्मा यांनी ईशान्य भारतात भाजपला मजबूत करण्यासाठी धोरणात्मक काम केले. २०१६ मध्ये, भाजपने त्यांची ईशान्य लोकशाही आघाडीचे (NEDA) संयोजक म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर, त्यांनी ईशान्य भारतातील प्रादेशिक पक्षांना भाजपसोबत एकत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. राजकीय विश्लेषकांच्या मते, ईशान्य भारतात भाजपचा झपाट्याने वाढणारा प्रभाव हा हिमंता बिस्वा सरमा यांच्या धोरणाचा एक प्रमुख घटक होता. शर्मा यांचे शिक्षण गुवाहाटीमध्ये झाले आणि त्यांनी कामरूप अकादमीमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी कॉटन कॉलेजमधून राज्यशास्त्रात बीए आणि एमए, नंतर गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून एलएलबीची पदवी मिळवली आणि गुवाहाटी उच्च न्यायालयात काही काळ वकिली केली. राजकीय प्रवासाची सुरुवात विद्यार्थी राजकारणातून झाली २००६ मध्ये, त्यांनी गुवाहाटी विद्यापीठातून पीएचडी पदवी प्राप्त केली. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात विद्यार्थी राजकारणातून झाली. १९९१-९२ मध्ये, त्यांनी कॉटन कॉलेज स्टुडंट्स युनियनचे सरचिटणीस म्हणून काम केले आणि नंतर ते ऑल आसाम स्टुडंट्स युनियनमध्ये (AASU) सामील झाले. १९९० च्या दशकात ते काँग्रेस पक्षात सामील झाले आणि २००१ मध्ये जलुकबारी मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले. विशेष म्हणजे, तेव्हापासून त्यांनी ही जागा सातत्याने जिंकली आहे.