हिमाचल प्रदेश लवकरच करोनामुक्त ठरण्याची शक्यता

सिमला – हिमाचल प्रदेशात करोनाचा केवळ एकच रुग्ण असल्याने हे राज्य लवकरच करोनामुक्त ठरण्याची शक्यता आहे. आतापर्यंत राज्यात 40 रुग्णांची “कोविड-19′ साठीची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे आणि केवळ एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
देशाच्या अन्य भागातून हिमाचल प्रदेशात येणाऱ्या कोणाही व्यक्तीने विलगीकरणाच्या निकषांचे काटेकोर पालन केले पाहिजे, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी दिले आहेत. आतापर्यंत “पॉझिटिव्ह’ ठरलेल्या बहुतेक सर्व 34 रुग्ण आता बरे झाले आहेत. केवळ एकाच रुग्णावर उपचार सुरू आहेत. राज्य सरकारच्या सामूहिक प्रयत्नांमुळे आणि लोकांच्या सहकार्याने हे राज्य लवकरच करोना मुक्त राज्य ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.
अन्य भागांमध्ये अडकलेल्या 1,314 नागरिकांना प्रत हिमाचल प्रदेशात आणण्यात आले आहे. हे नागरिक लॉकडाऊनमुळे चंदिगड, मोहाली आणि पंचकुला या शहरांमध्ये अडकून राहिले होते. एकूण 51 बसमधून या नागरिकांना परत आणण्यात आले असून आणखीन काही नागरिकांना येत्या 1-2 दिवसात हिमाचलमध्ये परत आणण्यात येणार आहे.
या नागरिकांच्या प्रवासाची पार्श्वभूमी आणि संपर्काची यादी नोंदवावी लागेल. तसेच त्यांची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाल्यावर त्यांना घरातच विलगीकरणामध्ये ठेवण्यात येणार आहे. राज्यात येणाऱ्या नागरिकांनी आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड करणे अनिवार्य करण्यात आले आहे.





