प्रभात वृत्तसेवा तळेगाव दाभाडे – नगरपरिषद निवडणुकीत राजकीय कल स्पष्ट झाला आहे. मोठ्या संख्येने उमेदवारांनी माघार घेतल्याने राष्ट्रवादी आणि भाजपच्या युतीने निवडणूक लढण्यापूर्वीच बिनविरोध बहुमत मिळविले आहे. परंतु नगराध्यक्ष पदासाठी मात्र जोरदार लढत होण्याचे चित्र दिसून येत आहे. मोठ्या संख्येने उमेदवारांनी माघार घेतली असल्याने राष्ट्रवादी व भाजप युतीने निवडणुकीपूर्वीच बहुमताचा आकडा ओलांडला आहे. अशातच नगराध्यक्ष पदही बिनविरोध निवडून आणण्याच्या प्रयत्नांना मत्र यश आले नाही. पर्यायाने आता नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत होणार आहे. तीनही उमेदवार तुल्यबळ असल्याने जनतेतून थेट निवडल्या जाणाऱ्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे. बिनविरोधचे वारे वाहत असताना नगराध्यक्षपदासाठी मात्र वातावरण पूर्णपणे उलट आहे. या पदासाठी प्रमुख गटांमध्ये जोरदार आणि चुरशीची लढत रंगणार आहे. प्रत्येक गटाकडून शक्तिप्रदर्शन, मतदारसंघातील दौरे आणि प्रचाराला वेग आला असून, मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध पद्धतींचा वापर सुरू आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत रंगणार आहे. दिग्गज उमेदवार या निवडणुकीत उतरल्याने चुरशीचे वातावरण निर्माण झाले आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार संतोष दाभाडे पाटील यांना भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचा संयुक्त पाठिंबा आहे. ते भाजपच्या कमळ चिन्हावरून रिंगणात असून, त्यांच्याविरोधात माजी नगराध्यक्षा रंजना भोसले आणि माजी उपनगराध्यक्ष किशोर भेगडे हे अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरले आहेत. नगरपरिषद प्रशासनाचा अनुभव असलेल्या या तिन्ही उमेदवारांमुळे नगराध्यक्षपदाची लढत अत्यंत प्रतिष्ठेची ठरणार आहे. दाभाडे पाटील यांना महायुतीचा अधिकृत पाठिंबा असल्याने त्यांचे बळ वाढले असले, तरी भोसले आणि भेगडे या दोन्ही अनुभवी उमेदवारांची जनाधारावरची पकड निवडणुकीला अधिक रंगत आणणार आहे. अन्यथा पक्षशिस्तभंगाची कारवाई… तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात उभ्या असलेल्या इच्छुकांनी तत्काळ माघार घ्यावी, अन्यथा पक्षशिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा भाजपचे निवडणूक प्रभारी गणेश भेगडे यांनी पत्रकार परिषदेत दिला. नगरपरिषद निवडणूक भाजप-राष्ट्रवादी (अजित पवार गट) महायुतीतर्फे लढवली जात असून, राष्ट्रवादीचे १७ आणि भाजपचे ११ उमेदवार अशी अधिकृत विभागणी झाली आहे. तरीही काही इच्छुकांनी पक्षादेश न मानता उमेदवारी दाखल केली आहे. त्यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन भेगडे यांनी केले.