पुणे – विधानसभा निवडणुकीत शिवाजीनगर मतदारसंघातून पराभूत झालेले काँग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट यांनी भाजपचे विजयी उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली निवडणूक याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. उच्च न्यायालयाने न्यायमूर्ती संदीप मारणे यांनी हा निकाल दिला. यामध्ये शिरोळे यांच्या वतीने ॲड. अनुराग मिश्रा आणि ॲड. रोहन नहार यांनी युक्तिवाद केला. मतदार यादीत छेडछाड झाल्याचा, मतदारसंख्येत संशयास्पद चढउतार झाल्याचा आणि निवडणूक प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत बहिरट यांनी निवडणूक रद्द करण्याची मागणी केली होती. तसेच मोठ्या मताधिक्याने झालेला आपला पराभव अशक्य असल्याचे त्यांनी म्हटले होते. या दाव्यात निवडणूक आयोगासह इतरांना पक्षकार करण्यात आले होते. या प्रकरणात शिरोळे यांच्यावतीने ॲड. अनुराग मिश्रा आणि ॲड. रोहन नहार यांनी याचिका फेटाळून लावण्याचा अर्ज दाखल केला होता. निवडणूक याचिका आवश्यक तपशील न देता अत्यंत बेजबाबदार पद्धतीने दाखल करण्यात आली आहे. याचिकेतील युक्तिवादांमध्ये प्रतिवादीची निवडणूक रद्द करण्याच्या कारवाईचे कारण मांडलेले नाही. अशी याचिका सुरुवातीलाच फेटाळण्यास पात्र आहे, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.