पॅरिस – युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी आज फ्रान्सचे अध्यक्ष मॅन्युएल मॅक्रॉ यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी मांडलेल्या युद्धबंदी प्रस्तावाबाबत चर्चा केली. रविवारी युक्रेन आणि अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये फ्लोरिडा येथे याच मुद्द्यावरून चर्चा झाली होती. ही चर्चा खूपच सकारात्मक झाल्याचे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माऱोको रुबिओ यांनी म्हटले होते. / बैठकीमध्ये अमेरिकेच्या युद्धबंदी प्रस्तावाच्या वाटाघाटींची उजळणी करण्यात आली होती. या प्रस्तावामध्ये अमेरिकेने रशियाला झुकते माप दिले असल्याची टीका झेलेन्स्की यांनी केली होती. युद्धबंदी पारदर्शक आणि समतोल शांतता राखणारी असावी, यासाठी चर्चा होणार असल्याचे मॅक्रॉ यांनी झेलेन्स्कींबरोबरच्या चर्चेपूर्वीम्हटले होते. झेलेन्स्की यांनी ब्रिटन,जर्मनी, पोलंड, इटली, नॉर्वे, फिनलंड, डेन्मार्क आणि नेदरलॅन्ड या युरोपातल्या अन्य मित्र देशांच्या नेत्यांबरोबरही चर्चा केली असल्याचेही मॅक्रॉ यांच्या कार्यालयाने म्हटले आहे. मॅक्रॉ आणि झेलेन्स्की यांच्यातल्या चर्चेमध्ये ऍन्टोनिओ कोस्टा आणि उर्सुला वोन डेर लेयन हे युरोपीयन संघाचे पदाधिकारी आणि नाटोचे सरचिटणीस मार्क रुट हे देखील सहभागी झाले होते. युक्रेनला संरक्षणाची गॅरंटी मिळावी आणि नाटोचे सदस्यत्व मिळण्याबाबतचा प्रस्ताव कायम रहावा, या मुद्द्यांचा आग्रह युरोपातल्या नेत्यांनी कायम ठेवल्यानंतर ट्रम्प यांच्या मूळ प्रस्तावात बरेच फेरबदल करण्यात आले आहेत. एकूण २८ मुद्द्यांची संख्या १९ पर्यंत कमी करण्यात आली आहे. दुसरीकडे अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ मंगळवारी मॉस्कोमध्ये रशियाचे अध्यक्ष पुतीन यांची भेट घेऊन या प्रस्तावाबाबत थेट चर्चा करणार आहेत. अमेरिकेने युरोप आणि युक्रेनला वगळून परस्पर रशियाशी चर्चा करण्याला युरोपीय संघाने तीव्र आक्षेप घेतला आहे. युरोपीय संघाच्या परराष्ट्र धोरण प्रमुख काजा कल्लास यांनी या प्रस्तावामध्ये युक्रेनला अधिक सवलती मिळाल्या पाहिजेत, असा आग्रह देखील धरला आहे.