Amruta Fadnavis Blackmail Case: अनिल जयसिंघानीला उच्च न्यायालयाचा दणका; याचिका फेटाळली

मुंबई : मुंबई सत्र न्यायालयापाठोपाठ उच्च न्यायालयाने अनिल जयसिंघानीला मोठा झटका दिला आहे. अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करणारी याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
बुकी अनिल जयसिंघानीला कोणताही दिलासा देण्यास नकार देत उच्च न्यायालयाने त्याची याचिका फेटाळून लावली आहे. आपली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत जयसिंघानी आणि त्याच्या भावाने दंडाधिकारी न्यायालयाने दिलेल्या रिमांडला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाने गेल्या आठवड्यात राखून ठेवलेला आपला निकाल सोमवारी जाहीर केला.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडून खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपात जयसिंघानीला अटक करण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयानं नुकताच अनिल जयसिंघानीचा जामीन अर्जही फेटाळून लावला आहे.
अमृता फडणवीसांच्याकडून 10 कोटी रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मलबार हिल पोलिसांनी 20 मार्च रोजी अनिल आणि त्याची मुलगी अनिक्षा यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. याप्रकरणी अनिल जयसिंघानी आणि त्याचा चुलत भाऊ निर्मल जयसिंघानीला गुजरातहून मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली होती.





