नवी दिल्ली – बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. पुढील सुनावणीपर्यंत पूजा खेडकरला अटक करू नये, असे आदेश न्यायालयाने दिल्ली पोलिसांना दिले आहेत. फसवणूक प्रकरणी पूजा खेडकर यांना न्यायालयाने २१ ऑगस्टपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले आहे. पूजाच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर उच्च न्यायालयाने दिल्ली पोलीस आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाला नोटीस बजावली आहे.
नागरी सेवा परीक्षेत फसवणूक करून उत्तीर्ण झाल्याप्रकरणी पूजा खेडकर विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पूजा यांनी जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले होते, ज्यात त्यांना जामीन नाकारण्यात आला होता. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांनी पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर सुनावणी करताना हा आदेश दिला. नागरी सेवा परीक्षेत अतिरिक्त संधी मिळविण्यासाठी त्याने आपली ओळख खोटी केल्याचा एफआयआरमध्ये आरोप आहे.
आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी पूजा खेडकर यांनी यूपीएससी नागरी सेवा परीक्षा २०२२ च्या अर्जात चुकीची माहिती दिल्याचा आरोप आहे. याचपार्श्वभूमीवर यूपीएससीने 31 जुलै रोजी खेडकर यांची उमेदवारी रद्द केली आणि त्यांना भविष्यातील परीक्षांपासून दूर केले.
यूपीएससीने उपलब्ध रेकॉर्डची काळजीपूर्वक तपासणी केली आहे आणि सीएसई-2022 नियमांच्या तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळले आहे, असे केंद्रीय लोकसेवा आयोगाने एका निवेदनात म्हटले आहे.