भुदरगड प्रकरणी हायकोर्टाने सहकार आयुक्तांना फटकारले

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील बुडीत निघालेल्या भुदरगड सहकारी पतसंस्थेच्या जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेच्या लिलाव प्रक्रियेत अडथळा येत आल्याने हायकोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली.
या संदर्भात न्या. सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठाने सहकार आयुक्तांनाच धारेवर धरले. आम्हाला सबबी सांगू नका. तुमच्या अधिकाराचा वापर करा. कायद्याच्या कसोटीवर कारवाई करा, असे खडे बोल ही न्यायालयाने सुनावले.
पतसंस्थेच्या गैरव्यवहारामुळे ठेवीदारांच्या कोट्यावधी रुपयांच्या ठेवी न मिळल्याने ठेवीदारांच्यावतीने कोल्हापूर. ठाणे. सिंधुदूर्ग. पुणे आदी भागातून दाखल केलेल्या याचिकांवर आज सुनावणी झाली. गेली कित्येक वर्ष प्रलंबित असलेल्या या याचिकेवर कोणतीही ठोस कृती होत नाही.
पतसंस्थेच्या जप्त केलेल्या मालमत्तेचा लिलाव होत नसल्याने ठेवीदारांच्या
ठेवी मिळण्यास विलंब होत असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांच्यावतीने करण्यात आला. यावेळी सरकारच्यावतीने लिलाव प्रक्रियेत अडचणी येत असल्याचे सांगताच न्यायालयाने संताप व्यक्त केला.
आता पर्यंत किती संचालकाच्या मालमत्तेवर. किती मालमत्तेचा लिलाव केला. किती ठेवदारांना ठेवी परत केल्या. याचा सविस्तर तपशील दोन आठवड्यात सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.





