कुऱ्हाडीने मारहाण करणाऱ्या आरोपीस उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मंजूर

पुणे – शेजारची शेळी शेतात गेली म्हणून एकाला कु-हाडीने मारहाण केल्याप्रकरणी आरोपीला उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला. ही घटना शिक्रापूर स्टेशनच्या हद्दीमध्ये हिवरे कुंभार या गावात घडली होती. बबन कान्हा जाधव असे अटकपूर्व जामीन मंजूर झालेल्या आरोपीचे नाव आहे.
फिर्यादीच्या हाताला जोरात मार लागल्याने त्यांचा हात फॅक्चर झाला. त्यामुळे शिक्रापूर पोलिस ठाण्यात आरोपी विरुद्ध भादवि कलम 326, 324, 504, 506 नुसार गुन्हा दाखल झाला. आरोपीने पुण्यामधील सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला. त्यामध्ये आरोपीचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला.
आरोपीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये अॅड. आशिष सातपुते, अॅड. महेश देशमुख अॅड. निलेश वाघमोडे यांच्यामार्फत अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी धाव घेतली. आरोपीचा फिर्यादीला कोणताही मोठी दुखापत करण्याचा हेतू नव्हता. फिर्यादी याने चार दिवसाच्या विलंबानंतर एफआयआर दाखल केली आहे. विलंब हा दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट घेत असल्यामुळे गुन्हा दाखल करण्यास विलंब झाला असा युक्तिवाद बचाव पक्षाने केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर केला.





