काबूल : तालिबानचे सर्वोच्च नेते हिबतुल्ला अखुंदजादा यांनी अफगाणिस्तानच्या इस्लामिक अमिरातीने पाकिस्तानशी चर्चा करावी मात्र त्यांच्यासमोर झुकु नये असे मत व्यक्त केले आहे. सध्याच्या घडीला अफगाणिस्तान व पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला असताना, अखुंदजादा यांचे वक्तव्य समोर आले आहे. सध्या तुर्कीतील इस्तांबूलमध्ये पाक व अफगाणिस्तान यांच्यात चर्चा सुरू आहे. मात्र, या चर्चेतून अद्यापही काही ठोस निर्णय घेण्यात आलेले नाहीत. मिळालेल्या माहितीनूसार, पाकिस्तानशी शांतता चर्चेसाठी इस्तंबूलला रवाना होण्यापूर्वी, अफगाण तालिबान शिष्टमंडळाने गटाचे सर्वोच्च नेते शेख हिबतुल्ला अखुंदजादा यांच्याशी दीर्घ बैठक घेतली. बैठकीदरम्यान, शिष्टमंडळाने अखुंदजादा यांना मागील फेरीच्या चर्चेच्या तपशीलांची माहिती दिली. यावेळी अखुंदजादा यांनी भविष्यातील सर्व चर्चा प्रामाणिकपणे होणे अपेक्षित असल्याचे सांगताना, झालेले निर्णय वास्तवात पूर्ण करता आले पाहिजेत, या दोन गोष्टींवर भर दिला. अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या हुकुमापुढे झुकू नये हे देखील त्यांनी शिष्टमंडळासमोर स्पष्ट केले. पाकिस्तान आपल्यावर अटी लादण्याच्या स्थितीत नसल्याचे देखील त्यांनी सांगितले. त्यामुळे अफगाणिस्तानचे शिष्टमंडळ त्यानूसार आपली भूमिका बदलू शकते, त्यामुळे कदाचित दोन्ही देशातील तणाव वाढण्याची शक्यता आहे. हा तणाव कायम राहिल्यास दोन्ही देशांमध्ये युद्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाकने आधीच दिली धमकी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी आधीच अफगाण तालिबानला युद्धाची धमकी दिली आहे. तालिबानशी शांतता चर्चा अयशस्वी झाली तर युद्धाचा मार्ग खुला असल्याचे ते म्हणाले होते. ख्वाजा असिफ यांच्या वक्तव्यावर तालिबानकडून देखील तीव्र प्रतिक्रिया देताना इस्लामाबादपर्यंत इस्लामिक अमिरातीचा पांढरा झेंडा फडकविण्यात येईल, असे म्हटले होते. सध्या दोन्ही देशांवर कतार व तुर्की यांच्याकडून तीव्र दबाव असल्याने, दोन्ही देश अनिच्छेने वाटाघाटी करत आहेत.