satara | अहो, तुमचे मत लोकशाहीचा प्राण आहे!

सातारा, (प्रतिनिधी)- जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकशाहीचा उत्सव १९ एप्रिलपासून सुरू झाला आहे. राज्यात साक्षरता मोहिमेच्या प्रचारात पुढाकार घेतलेल्या आणि राष्ट्रीय पातळीवर दखल घेतलेल्या सुशीला क्षीरसागर आणि रुचिता क्षीरसागर या आजी- नाती नवसाक्षरांसह सर्व पात्र मतदारांना मताधिकार बजवण्यासाठीही प्रेरणा देत आहेत.
लोकशाहीत मत नोंदवण्याचे महत्त्व लक्षात घेता ‘तुमचे मत लोकशाहीचा प्राण आहे’ अशा शीर्षकासहया आजी-नातीचे छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे. नवसाक्षरांसह सर्व मतदारांना मताधिकार बजावण्याचे आवाहन करणाऱया या छायाचित्रात अहो, आजी- आजोबा, आई- बाबा, काका- काकू, मामा- मामी मताधिकार बजवायचा हं! असे आवाहनही त्यांनी केले आहे.
साक्षरता मोहिमेत उल्हास भाग दोनमध्ये मतदान प्रक्रियेची ओळख व्हावी म्हणून सविस्तर माहिती सचित्र देण्यात आली आहे. त्यात मतदान केंद्र, ईव्हीएम मशीन, निवडणूक अधिकारी, उमेदवार,ओळखपत्र, मतदान सूची, मतदान केल्याचा पुरावा यासह संपूर्ण प्रक्रिया सांगितलेली आहे. मत ही एक ताकद आहे आणि त्याद्वारेच लोकशाही बळकट होते.
ही बाबही असाक्षरांवर बिंबवण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेविषयी माहिती देण्यात आल्यामुळे कमी अधिक प्रमाणात नवसाक्षरांना या प्रक्रियेची माहिती मिळाली आहे. शंभर टक्के नवसाक्षरांनी मताधिकार बजवावा म्हणून या आजी- नाती पुन्हा प्रेरणा देत आहेत.





