“अहो नड्डा, जरूर पहा हा खड्डा.. “

मुंबई – राज्यातील आगामी निवडणुकांचे सुरु होणारे वारे लक्षात घेत भाजपने जोरदार मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी चंद्रपूर आणि औरंगाबाद येथे जोरदार शक्तिप्रदर्शन करत सभा घेतल्या, औरंगाबाद येथे नड्डा यांची सभा सुरु असताना लोक उठून जात असलेला एक व्हिडीओ विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्विट केला आहे.
“अहो अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, जरूर पहा हा खड्डा.. लोक आपले भाषण सुरू होण्यापूर्वीच खुर्च्या सोडून गेले. संभाजीनगर फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे आहे.. हे आज तुमच्याच साक्षीने जनतेने अधोरेखित करून टाकले आहे.” अशा आशयाचे ट्विट अंबादास दानवे यांनी केले आहे.दानवे यांनी यावेळी काही रिकाम्या खुर्च्यांचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अहो अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, जरूर पहा हा खड्डा..
लोक आपले भाषण सुरू होण्यापूर्वीच खुर्च्या सोडून गेले. संभाजीनगर फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे आहे.. हे आज तुमच्याच साक्षीने जनतेने अधोरेखित करून टाकले आहे. pic.twitter.com/8lmZwoKLIY
— Ambadas Danve (@iambadasdanve) January 2, 2023
औरंगाबादमधील मराठवाडा सांस्कतिक मंडळाच्या मैदानावर जे.पी.नड्डा यांची ही सभा पार पडली. नड्डा यांनी यावेळी बाळासाहेबांचा जो उल्लेख केला त्यावर देखील दानवे यांनी टिपण्णी केली आहे. “नड्डाजी, यापुढे महाराष्ट्रात येताना ‘बाळासाहेब ठाकरे’ हे नाव पाठ करून या. आज सभेत आपण त्यांचा ‘बाळासाहेब देवरस’ असा उल्लेख केला. जे बाळासाहेबांच्या नावाचा उल्लेख धड करू शकत नाहीत, ते त्यांच्या धगधगत्या विचारांचा वारसा काय सांभाळणार” असही दानवे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.
नड्डाजी, यापुढे महाराष्ट्रात येताना ‘बाळासाहेब ठाकरे’ हे नाव पाठ करून या. आज सभेत आपण त्यांचा ‘बाळासाहेब देवरस’ असा उल्लेख केला. जे बाळासाहेबांच्या नावाचा उल्लेख धड करू शकत नाहीत, ते त्यांच्या धगधगत्या विचारांचा वारसा काय सांभाळणार!
— Ambadas Danve (@iambadasdanve) January 2, 2023
चंद्रपूर येथील सभेत उद्धव ठाकरेंवर निशाणा
शौर्य व विरतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांनी केवळ सत्तेच्या लालसेपोटी विचारसरणीशी तडजोड केली आणि भाजपच्या पाठीत वार केला, असा आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केला. परंतु नवीन सरकार त्यांना योग्य उत्तर देईल, असा इशाराही त्यांनी दिली.चंद्रपूर येथील “विजय संकल्प’ रॅलीला संबोधित करताना ते बोलत होते.





