आता पुन्हा होणार ‘हेरा फेरी’, अक्षय कुमारने चाहत्यांना दिले सरप्राइज, प्रमुख भूमिकेत दिसणार ‘हे’ कलाकार

Hera Pheri 3 Announced: वर्ष 2000 मध्ये आलेला ‘हेरा फेरी’ हा चित्रपट प्रचंड गाजला. आजही हा बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय कॉमेडी चित्रपटांपैकी एक आहे. यानंतर 2006 साली ‘हेरा फेरी 2’ देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला. तेव्हापासून या चित्रपटाचे चाहते पुढील भाग कधी येणार याची वाट पाहत आहेत. प्रेक्षकांची प्रतिक्षा लवकरच संपणार असून, ‘हेरा फेरी 3’ ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या 68व्या वाढदिवसानिमित्ताने या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. ‘हेरा फेरी 3’च्या माध्यमातून मूळ चित्रपटातील प्रमुख कलाकार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता अक्षय कुमार, सुनील शेट्टी व परेश रावल हे कलाकार पुन्हा एकदा प्रेक्षकांना खळखळून हसवायला येत आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियदर्शन हे करणार आहेत. याबाबत त्यांनी स्वतः सोशल मीडियावर माहिती दिली. प्रियदर्शन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अक्षयने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा सर, भूतांनी वेढलेल्या, झपाटलेल्या सेटवर दिवस घालवण्यापेक्षा चांगला मार्ग कोणता असू शकतो. माझे मार्गदर्शक असल्याबद्दल आणि गोधंळाची स्थितीही उत्कृष्ट कृतीत रूपांतरित करणारी एकमेव व्यक्ती असल्याबद्दल धन्यवाद. तुमचा दिवस कमी रिटेकने भरलेला असो. तुम्हाला हे वर्ष चांगले जावो यासाठी शुभेच्छा.’
Thank you so much for your wishes Akshay . In return I would like to give you a gift , I’m willing to do Hera Pheri 3 , Are you ready @akshaykumar , @SunielVShetty and @SirPareshRawal ? https://t.co/KQRdbKMu3D
— priyadarshan (@priyadarshandir) January 30, 2025
अक्षयच्या या शुभेच्छांना उत्तर देताना प्रियदर्शन यांनी चित्रपटाची घोषणा केली. प्रियदर्शन यांनी एक्सवर (ट्विटर) लिहिले की, तुझ्या शुभेच्छांसाठी खूप खूप धन्यवाद, अक्षय. मी या बदल्यात तुलाही एक गिफ्ट देऊ इच्छितो. मी हेरा फेरी 3 करायला तयार आहे. तुम्ही तयार आहात का? असे म्हणत त्यांनी अभिनेता अक्षय कुमार, सुनील शेट्टी व परेश रावल यांनाही पोस्टमध्ये टॅग केले आहे.
अक्षयनेही यावर प्रतिक्रिया देत तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी मला आयुष्यातील सर्वोत्तम गिफ्ट मिळाल्याचे म्हटले आहे. दरम्यान, सध्या प्रियदर्शन यांच्या ‘भूत बंगला’ चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अक्षय व प्रियदर्शन हे तब्बल 15 वर्षांनी एकत्र काम करत आहेत. या चित्रपटात अक्षयसोबत परेश रावल, तब्बू, वामिका गब्बी, राजपाल यादव, गोवर्धन असरानी हे कलाकार देखील आहेत. हा चित्रपट 2 एप्रिल 2026 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


