satara | यापुढे सर्व निवडणुकांमध्ये मनोमिलन राहणार

सातारा, (प्रतिनिधी) – सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि मी यापुढे सातत्याने एकत्र राहू. हे मनोमिलन लोकसभा विधानसभेपुरते मर्यादित नाही. स्थानिक स्वराज्य संस्था आणि यापुढील सर्व निवडणुकांमध्ये ते कायम राहील शिवेंद्रसिंहराजे यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व करावे त्यांना मंत्री करण्याची जबाबदारी माझी आहे.
छत्रपती शिवराय यांची शपथ घेऊन सांगतो आम्ही दोघे एकत्र राहू आणि जिल्ह्याचा विकास करू असे स्पष्ट आश्वासन खासदार उदयनराजे भोसले यांनी महायुतीच्या मेळाव्यात जाहीरपणे दिले
अजिंक्यतारा कारखान्यावर महायुतीचा विराट मेळावा झाला . त्यावेळी उदयनराजे भोसले बोलत होते यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. महेश शिंदे, माजी आमदार आनंदाराव पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, मनोज घोरपडे, वसंतराव मानकुमरे, सुनील काटकर, राजू भोसले, काका धुमाळ, अशोक मोने, ज्ञानदेव रांजणे,
विक्रम पवार सौरभ शिंदे, रवी साळुंखे, अविनाश कदम, भाजप महिला प्रदेश कार्यकारिणीच्या उपाध्यक्ष सुवर्णाताई पाटील, चित्रलेखा माने-कदम, माजी नगराध्यक्ष माधवी कदम, माजी नगराध्यक्षा रंजना रावत, गीतांजली कदम, संग्राम बर्गे, मनोज शेंडे, फिरोज पठाण, रामकृष्ण वेताळ , सुनील खत्री ,शारदा जाधव इत्यादी यावेळी उपस्थित होते.
खासदार उदयनराजे भोसले म्हणाले कार्यकर्ता यांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्या भावना तुमच्याही मनात आहेत. मनोमिलनासाठी मुख्य अडचण काही लोक होते, ते मनोमिलन कायमस्वरूपी ठेवायचे आहे. विचारांची एकी झाली आणि विकासाचा अजेंडा पक्का झाला मग त्यामध्ये दुफळी तयार होत नाही. एकीमध्ये जी ताकद आहे ती दुफळीत नसते, आम्ही एकत्र आलो आहोत ते काही निवडणुकांपुरते नाही.
भविष्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी ते लागू असेल छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगतो जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. शिवेंद्रसिंह राजे यांना मंत्री करायचे जबाबदारी माझी आहे, लाल दिवा नसल्याची खंत आहे. त्यासाठी काही धोरणात्मक गोष्टी आपण ठरवूया पाण्याचा काटेकोर वापर एमआयडीसीचा विकास तसेच पाणी योजनांसाठी केंद्राकडून कोट्यवधी रुपयाचा लागणारा निधी या विषयावर धोरणात्मक चर्चा करून त्यावर निर्णय घेऊ, असे आश्वासन उदयनराजे यांनी दिले.
तत्कालीन मंत्री गोपीनाथ मुंडे यांनी कृष्णा खोरे प्रकल्पाची संकल्पना मांडली मात्र इच्छाशक्तीच्या अभावामुळे हे प्रकल्प पूर्ण झाले नाही पण तरीही धरणांची निर्मितीमुळे पाणी उपलब्ध होऊन माळराने हिरवीगार झाली भविष्यात पुन्हा पाण्यावरून वाद होणार आहेत पूर्वी जिल्ह्याचे पाणी दुसरीकडे नेण्यात आले विस्थापित झालेल्या लोकांचे मोठे नुकसान झाले यासाठी नदीजोड सारखा मोठा प्रकल्प राबवला गेला पाहिजे त्याकरता केंद्र शासनाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयाचा निधी उपलब्ध करून देऊ, असेही उदयनराजे म्हणाले.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, मी पक्षनिष्ठ असून ध्येय धोरणाप्रमाणे काम करणारा नेता आहे. भाऊसाहेब महाराजांनी मेव्हणे असतानाही त्यांच्या विरोधात काम करून पक्षाचे काम केले होते. पक्षाने आदेश दिल्यास मी व माझा कार्यकर्ता कुठे जाणार नाही. मागे संघर्ष झाला असेल पण कार्यकर्त्यांच्या पाठीशी मी उभा होतो, यापुढेही उभा राहणार आहे.
कार्यकर्त्यांच्या मंत्रीपदाच्या भावना चांगल्या आहेत. मात्र योग्य वेळी त्याची संधी मिळेल स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना कोणतीही अडचणी येऊ देणार नाही. कोयना बॅक वॉटरवर सी प्लॅन विमानसेवेची ट्रायल झाली आहे. मुंबईतून थेट पर्यटक शिवसागर जलाशयावर येऊ शकतात मुख्यमंत्र्यांनी एमटीडीसीला सूचना केल्या आहेत. सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी पक्षाची ध्येय धोरणे अत्यंत ताकतीने राबवणार असल्याचे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केले.
पालकमंत्री शंभूराजे देसाई म्हणाले, उमेदवारी कोणाला मिळणार ही केवळ औपचारिकता राहिली आहे. पक्ष श्रेष्ठींचा आदेश येण्यापूर्वी काम करण्याची भूमिका घेतली आहे. महायुती प्रचारात व नियोजनात पुढे गेली आहे. आघाडीचा उमेदवार कोण याची वाट न पाहता महायुतीने प्रचाराचे धोरण निश्चित केले आहे. महायुतीचे मत म्हणजे मोदींना मत हे स्पष्ट आहे.
आमदार महेश शिंदे म्हणाले, आजची गर्दी पाहून सातारा लोकसभेचा निर्णय दोन मतदारसंघ होईल असे वाटले होते. मागच्या वेळेला आम्ही चुकलो होतो. महाराज तुमची चूक नव्हती मात्र या वेळेला मागच्या चुकीचा बदला घेण्यासाठी एकत्र आलो आहे. आपण निवडून जाणे ही फक्त औपचारिकता शिल्लक आहे.
कायमस्वरूपी एकत्र राहा
कार्यकर्त्यांच्या भाषणामध्ये साताऱ्याचे माजी नगराध्यक्ष अशोक मोने यांचे भाषण लक्षवेधी ठरले अशोक मोने म्हणाले, लोकसभेला एकत्र येता, मग विधानसभा झेडपी, पंचायत समितीसाठी एकत्र का येत नाही ? रोजगारासाठी जिल्ह्यातील युवक बाहेर गावी जातात त्यांच्यासाठी मोठा उद्योग आणावा. जिल्ह्यासाठी दोघांनी मिळून काही गोष्टी केल्यास जिल्हा नावारूपाला येईल.
बाकीच्या निवडणुकांनाही मनोमिलन ठेवावे निवडणुका आल्या की झप्पी घ्यायची मुके घ्यायचे हे आमच्या वेळी का नाही करायचे ? फक्त इलेक्शन पुरते मिळून न राहता कायमस्वरूपी राहा कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहून कार्यकर्त्यांना धीर द्या. जिल्हा विकसित करायचा असेल तर हे दोन्ही राजे करू शकतात.





