पुणे-गर्भवतीच्या रक्ताच्या नमुन्यांद्वारे बाळाला रक्ताचा कॅन्सर, अनिवंशिक आजार, गुणसूत्रांची आणि पेशींमधील विकृती शोधण्यास जेनेटिक तपासणीद्वारे शक्य होणार आहे. त्यामुळे बाळ जन्माला येण्याअधीच ही सर्व माहिती मिळणार असून, पुढील धोका टाळता येणार आहे. हे शक्य आहे ते केवळ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे (एमयुएचएस) महाराष्ट्रातील पहिली शासकीय “जेनेटिक लॅब ऍन्ड कॅन्सर रिसर्च सेंटरमुळे. पुण्यातील डॉ. घारपुरे मेमोरिअल बंगल्यात ही लॅब तयार करण्यात आली असून, त्यामध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्री आहे. प्रसुतीनंतर बाळाला अनुवंशिक आजार किंवा रक्ताचा कॅन्सर, स्नायू कमकुवत असे विविध आजार समोर येतात. त्यामुळे त्या बाळाला आणि कुटुंबाला मोठा त्रास सहन करावा लागतो. मात्र, आता बाळ जन्माला येण्याअधीच त्याच्यामध्ये असलेल्या आजाराबाबत माहिती मिळणे शक्य होणार आहे.
आई आणि बाळाच्या रक्ताच्या नमुन्यावरून बाळाला थॅलेसेमिया (रक्ताच्या कॅन्सरचा एक प्रकार), मस्क्यूलर डिस्ट्राफी (स्नायूंचा कमकुवतपणाचा विविध रोगांचा गट असलेला अनुवंशिक आजार), क्रोमोझोमोनल ब्नॉर्मिलीटी (गुणसूत्रांची विकृती) अशा बाळांमधील जन्मजात विकृती ओळखण्यासाठी चाचण्यांचा उपयोग होणार आहे.
तसेच डाऊन सिंड्रोमसारख्या समस्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या गर्भवती मातांची तपासणी (एनआयपीटी) प्रयोगशाळेत केली जाणार आहे. असे मॉलिक्युलर ऑनकॉलॉजिस्ट तथा या प्रयोगशाळेच्या प्रमुख डॉ. अनुराधा चौगुले यांनी सांगितले.
प्रयोगशाळेची वैशिष्ट्ये…
महाराष्ट्रातील पहिली शासकीय जेनेटिक लॅब
दररोज 30 ते 90 नमुन्यांच्या तपासण्यांची क्षमता
संपूर्ण राज्यातील 48 शासकीय रुग्णालयांमधून नमुने येणार
तपासण्यांसह संशोधन व कॅडमिक प्रोगॅमही चालवणार
टाटा कॅन्सरमधील तज्ज्ञांचा समावेश
गरीबांसाठी मोफत
ज्या तपासण्यांसाठी खासगींमध्ये 50 हजार ते दोन लाख रूपये लागतात. त्या तपासण्या गरिबांसाठी मोफत तर सर्वसामान्यांना परवडेल असे अवघ्या 5 ते 10 हजारांत होतील. लॅबमध्ये येणारा प्रत्येक रुग्ण हा गरीब आणि सर्वसामान्य आहे, हे समजूनच उपचार दिले जातील. तसेच कॅन्सरशी संबंधित संशोधनावर प्रयोगशाळेत भर दिला जाणार आहे. तसेच स्वतंत्र ओपीडीही सुरू राहणार असून, त्यासाठी डॉक्टरांची टीम तैनात केली आहे.
या होणार तपासण्या…
या लॅबमध्ये मॉलिक्युलर बायोलॉजी, बायोकेमिकल आणि कायटोजेनेटिक टेस्ट, कॅरिओटायपिंग, फिश, न्यू बॉर्न स्क्रिनिंग, एचपीएलसी फॉर थॅलेसमिया, कार्डिऍक रिस्क पॅनल, डायबेटिक रिस्क पॅनेल तपासण्या होतील.