मोठी बातमी! ‘या’ महिला नेत्याचा शिंदेंच्या शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’

नाशिक: काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्तेपदाचा राजीनामा देऊन दीड महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या हेमलता पाटील यांनी आता शिंदे गटालाही ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. यामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सध्या कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे हेमलता पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
काँग्रेसमधील नाराजी ते शिवसेना प्रवेश –
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत हेमलता पाटील नाशिक मध्य मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक होत्या. मात्र, महाविकास आघाडीच्या जागावाटपात ही जागा ठाकरे गटाच्या शिवसेनेला मिळाली आणि माजी आमदार वसंत गीते यांना उमेदवारी देण्यात आली. यामुळे नाराज झालेल्या हेमलता यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले. “अनेक वर्षे प्रामाणिकपणे काम करूनही पक्षाने माझ्यावर अन्याय केला. नेतृत्वाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि नेते एकमेकांच्या कुरघोडीत व्यस्त आहेत,” असे त्या म्हणाल्या होत्या. यानंतर त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन शिंदे गटात प्रवेश केला.
शिवसेनेलाही रामराम –
शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर अवघ्या दीड महिन्यात हेमलता पाटील यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. एका व्हिडिओ संदेशात त्या म्हणाल्या, “मी ३५ वर्षे काँग्रेसमध्ये प्रामाणिकपणे काम केले. निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेस सोडली. शिंदे गटात प्रवेश केला, पण मी पक्षाला आणि कार्यकर्त्यांना योग्य न्याय देऊ शकत नाही, अशी माझी भावना आहे. प्रामाणिकपणे काम करणे मला शक्य नसल्याने सध्या कोणत्याही पक्षात जाणार नाही.”
नाशिकमध्ये गटबाजीचा परिणाम?
नाशिकमधील शिंदे गटात सध्या गटबाजी वाढल्याची चर्चा आहे. संघटनात्मक कामांचा अभाव आणि कार्यकर्त्यांमधील संभ्रम यामुळे हेमलता पाटील यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. या घडामोडींमुळे नाशिकच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.




