हेमंत सोरेन यांनी घेतली मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी यांची भेट

नवी दिल्ली : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी मंगळवारी कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली. त्या भेटीत झारखंडमधील आगामी विधानसभा निवडणुकीविषयी चर्चा झाल्याचे समजते. सोरेन पत्नी कल्पना यांच्यासह देशाची राजधानी दिल्लीत दाखल झाले. त्या दाम्पत्याने खर्गे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यावेळी राहुल आणि कॉंग्रेसचे सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल हेही उपस्थित होते.
सोरेन आणि कॉंग्रेस नेत्यांनी संबंधित भेट सदिच्छा स्वरूपाची असल्याचे म्हटले. मात्र, त्या भेटीत जवळ येऊन ठेपलेल्या झारखंड निवडणुकीसाठीच्या तयारीवर चर्चा झाल्याचे समजते. हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चाला (झामुमो) नुकताच मोठा राजकीय हादरा बसला. त्या पक्षाला रामराम ठोकून माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे झारखंडमध्ये आगामी काळात राजकीय उलथापालथी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर, हेमंत सोरेन यांच्या दिल्ली दौऱ्याचे महत्व वाढले आहे.
हेमंत सोरेन यांच्या भेटीनंतर राहुल यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली. झारखंडमधील जनतेच्या हितासाठी इंडिया आघाडीतील एकजूट कायम आहे. तेथील निवडणुकीत इंडिया आघाडी मोठ्या बहुमताने विजय मिळवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार सत्तेवर आहे. त्या आघाडीत झामुमो, कॉंग्रेस आणि राजदचा समावेश आहे. चंपाई सोरेन यांच्या भाजप प्रवेशाने केवळ झामुमोसमोरच नव्हे; तर सत्तारूढ आघाडीपुढे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आघाडीने आतापासून मोर्चेबांधणी सुरू केल्याचे मानले जाते.





