‘महाराष्ट्रातही चित्रपटाच्या तिकिटाचे दर 200 रुपये करा’, कर्नाटकातील निर्णयानंतर आता ‘या’ मराठी अभिनेत्याने केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Hemant Dhome | स्मार्टफोनवर कोणताही चित्रपट सहज उपलब्ध होत असला तरीही थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहण्याचा आनंद काही वेगळाच असतो. मात्र, बऱ्याचवेळी तिकिटांची किंमत जास्त असल्याने थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहणे शक्य होत नाही. यावर तोडगा म्हणून आता कर्नाटक सरकारने तिकिटाचे दर 200 रुपये निश्चित केले आहेत. यामुळे आता कर्नाटक राज्यात चित्रपट फक्त 200 रुपयात पाहता येणार आहे. कर्नाटक सारखाच निर्णय महाराष्ट्रातही लागू केला जावा, अशी मागणी आता केली जात आहे.
कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही तिकीट दर कमी करावे व आपल्या भाषेतला चित्रपट मोठा व्हावा यासाठी सरकारने पाऊल उचलावे, अशी मागणी अभिनेता –दिग्दर्शक हेमंत ढोमेने केली आहे. हेमंतने ट्विट करत कर्नाटक सरकारच्या तिकीट दराच्या निर्णयाचे स्वागत केले. तसेच, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टॅग करत असाच निर्णय राज्यातही घेतला जावा, अशी मागणी केली आहे.
हेमंत ढोमेने ट्विटर पोस्टमध्ये लिहिले की, कर्नाटक सरकारचा ऐतिहासिक निर्णय! कर्नाटक या आपल्या शेजारच्या राज्याने आज एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.सर्वच्या सर्व सिनेमागृहात चित्रपटाच्या तिकिटांची किंमत ही जास्तीत जास्त 200 रुपये इतकी मर्यादित असणार! आपल्या भाषेतला चित्रपट मोठा व्हावा यासाठी उचलेलं हे एक अत्यंत महत्त्वाचं आणि संपूर्ण देशाला मार्गदर्शक असं पाऊल ठरणार आहे.
कर्नाटक सरकार चा ऐतिहासिक निर्णय!
कर्नाटक या आपल्या शेजारच्या राज्याने आज एक अत्यंत महत्तवाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे!
सर्वच्या सर्व सिनेमागृहात चित्रपटाच्या तिकिटांची किंमत ही जास्तीत जास्त २०० रुपये इतकी मर्यादित असणार!
आपल्या भाषेतला चित्रपट मोठा व्हावा यासाठी उचलेलं… pic.twitter.com/v6TqfcXYUc
— Hemant Dhome । हेमंत ढोमे (@hemantdhome21) March 7, 2025
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना टॅग करत त्याने लिहिले की, आपल्या दोघांकडून अशाच निर्णयाची अपेक्षा मी एक प्रेक्षक म्हणून सगळ्यात आधी करतो आणि त्या नंतर मराठी भाषा आणि आपल्या भाषेतील चित्रपटांच्या भवितव्याकरिता सिनेमागृहांच्या मनमानी कारभाराला आपण आळा घालाल हीच इच्छा. महाराष्ट्रात मराठी चित्रपटांना स्क्रीन्स उपलब्ध होणं, त्यांना प्राईम टाईम मिळणं यासाठी आता कायदा करण्यात यावा. महाराष्ट्रात मराठीलाच प्राधान्य हवं.
महाराष्ट्रात सगळ्याच चॅनल्स आणि OTT प्लेटफार्मसची कार्यालयं आहेत, तर कर्नाटक सरकार सारखं आपणही त्या सर्वांना मराठीला प्राधान्य देणे अनिवार्य करावे, अशी मागणीही हेमंत ढोमे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
दरम्यान, कर्नाटक सरकारने अर्थसंकल्पात राज्यात चित्रपटांसाठीचे तिकीट दर 200 रुपये निश्चित केले आहेत. थिएटर मालकांना तिकिटासाठी यापेक्षा अधिक शुल्क आकारता येणार नाही. कर्नाटक सरकारच्या या निर्णयाचे चित्रपटप्रेमींकडून स्वागत केले जात आहे.





