Hema Malini: हेमा मालिनींनी धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट ‘इक्कीस’ का पाहिलेला नाही? कारण सांगताना म्हणाल्या…

Hema Malini: बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाला दीड महिन्यांहून अधिक काळ झाला असला, तरी त्यांच्या जाण्याचं दुःख कुटुंबीय आणि चाहत्यांच्या मनातून अजूनही गेलेलं नाही. त्यांची पत्नी आणि प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपली भावना व्यक्त केली.
धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट ‘इक्कीस’ त्यांच्या निधनानंतर प्रदर्शित झाला. मात्र हा चित्रपट आपण आणि आपल्या मुलींनी अजून पाहिलेला नाही, असं हेमा मालिनी यांनी स्पष्ट केलं आहे.
एका मुलाखतीत हेमा मालिनी म्हणाल्या की, धर्मेंद्र यांच्या शेवटच्या दिवसांत त्यांची प्रकृती कधी सुधारत होती, तर कधी अचानक खालावत होती. “ते शेवटचे काही दिवस घरीच होते. रुग्णालयातून परतल्यानंतर ते बरे होतील, अशी आम्हाला पूर्ण खात्री होती. आधीही अनेक वेळा ते उपचार घेऊन हसत-खेळत घरी परतले होते. त्यामुळे यावेळीही आम्हाला तशीच आशा होती. पण अचानक त्यांची प्रकृती बिघडली,” असं त्यांनी सांगितलं.
View this post on Instagram
धर्मेंद्र यांच्या शेवटच्या चित्रपटाबद्दल बोलताना हेमा मालिनी म्हणाल्या, “‘इक्कीस’ चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा मी मथुरेत होते. तिथे माझी कामं होती. शिवाय, सध्या तो चित्रपट पाहणं माझ्यासाठी खूप भावनिक ठरेल. माझ्या मुलींनाही तसंच वाटतं. कदाचित मी तो नंतर पाहीन, जेव्हा या दुःखातून थोडी सावरले असेन.”
दरम्यान, देओल कुटुंबात मतभेद असल्याच्या चर्चांवरही हेमा मालिनी यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “आमचं नातं नेहमीच चांगलं राहिलं आहे. आमच्यात परस्पर आदर आहे. लोकांना आमच्यात काही बिनसलं आहे असं का वाटतं, हेच मला कळत नाही. लोकांना गॉसिप हवी असते. मला त्यावर स्पष्टीकरण देण्याची गरज वाटत नाही. हे माझं वैयक्तिक आयुष्य आहे आणि आम्ही सगळे आनंदात आहोत,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.





