पुणे | स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी हेल्पलाइन

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्यातील लिंग गुणोत्तर प्रमाण वाढविण्यासाठी आणि स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी पीसीपीएनडीटी आणि एमटीपी या कायद्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी विविध उपक्रम आणि उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
त्यानुसार गर्भधारणापूर्व आणि प्रसूतिपूर्व निदानतंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा १९९४ आणि सुधारित कायदा २००३ ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत असून, स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी राज्यात तक्रार नोंदवण्यासाठी, तसेच शंकेचे निरसन करणेसाठी १८००२३३४४७५ आणि १०४ ही टोल फ्री हेल्पलाइन सेवा २४ तास सुरू करण्यात आली आहे.
या हेल्पलाईनद्वारे फेब्रुवारी २०२४ पर्यंत १०६९ तक्रारी नोंदविण्यात आल्या असून, १०६४ तक्रारींचे निवारण राज्य कुटुंब कल्याण कार्यालय, पुणे यांच्यामार्फत करण्यात आलेले आहे.
हा क्रमांक पूर्वी कार्यान्वित होता; परंतु आता हा क्रमांक आरोग्य विभागाच्या हेल्पलाईन क्रमांक १०४ मध्ये २२ फेब्रुवारीपासून समाविष्ट करण्यात आला ही सेवा जनतेसाठी २४ तास पूर्ण वेळ उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे आता पीसीपीएनडीटी उपरोक्त क्रमांक आणि आरोग्य विभागाचा हेल्पलाईन क्रमांक १०४ हे दोन्हीं हेल्पलाइन क्रमांक पीसीपीएनडीटी तक्रार नोंदविण्यासाठी चालू ठेवण्यात आले आहेत.
दोन्ही टोल फ्री हेल्पलान क्रमांकावर कोणीही तक्रार दिल्यास ती तक्रार गोपनीय राहील आणि तक्रार देणाऱ्यास त्याची इच्छा असल्यास ते नाव देखील नोंदवू शकतील आणि पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत तक्रार निपटारा होऊन गर्भलिंग निदान करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी तक्रार केल्यानंतर त्यावर यशस्वी अंमलबजावणी झाल्यास तक्रारदारास शासनामार्फत खबरी बक्षीस योजनेअंतर्गत रक्कम एक लाख रुपये देण्यात येणार आहे.
नागरिकांनी आरोग्य विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाइनचा लाभ घ्यावा. त्याचबरोर समाजातील जन्म लिंग गुणोत्तर प्रमाण वाढविण्यास सक्रीय सहभाग नोंदवावा आणि स्त्री भ्रूणहत्या रोखण्यास साह्य करावे. – प्रा. डॉ. तानाजी सावंत, आरोग्यमंत्री




