अडीच वर्षांच्या मुलीकडून हेल्मेटचा आवर्जून वापर
पुणे – हेल्मेट वापराबाबत वाहतूक पोलिसांकडून नियमित प्रबोधन करण्यात येते. मात्र, अद्याप नागरिकांमध्ये अपेक्षित प्रतिसाद दिसत नाही. परंतु, शहरामध्ये प्रवास करताना अडीच वर्षांची चिमुकली हेल्मेटचा आवर्जून वापर करत असल्याने नागरिकांनीदेखील याचे अनुकरण करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.
दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी ऋचा आशिष फडके आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्याबरोबर हेल्मेट परिधान केलेली त्यांची अडीच वर्षांची मुलगी आराधना होती. हेल्मेट परिधान केल्याचे पाहून आम्ही फडके यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मुलीच्या सुरक्षिततेसाठी तिला बसणारे लहान आकाराचे खास हेल्मेट घेतले असल्याचे सांगितले, अशी माहिती दत्तवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे यांनी दिली.
हेल्मेट हे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आहे. केवळ पोलीस आपल्यावर दंडात्मक कारवाई करतात म्हणून न वापरता ते आपल्या स्वत:च्या सुरक्षिततेसाठी असल्याचे या मुलीने दाखवून दिले आहे, असे घेवारे म्हणाले.