इस्लामाबाद – पाकिस्तानच्या मंडी बहाउद्दीन भागात हेलीकॉप्टरमधून चक्क नोटांचा वर्षाव होत असल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. येथे एक विवाह सोहळा संपन्न होत असताना उपस्थित वऱ्हाडी मंडळींवर फुलांसोबत नोटांचाही वर्षाव करण्यात आलीची माहिती त्याचा तपास केल्यावर समोर आली आहे. नवरदेवाचा भाउ विदेशात राहतो आणि त्यानेच नोटांचा वर्षाव करण्यासाठी हेलीकॉप्टर भाड्याने घेतल्याचीही माहिती देण्यात आली.
पाकिस्तानला दिवाळखोरीचा सामना करावा लागतो आहे. देशाची आर्थिक स्थिती पूर्णत: कोलमडली असून महागाईने आतापर्यंतचा उच्चांक प्रस्थापित केला आहे. सार्वजनिक सोहळे समारंभात लोकांनी अन्नाची नासाडी करू नये यासाठी सरकारने काही निर्देश दिले असतानाही अशा प्रकारे हेलीकॉप्टरमधून नोटांच्या वर्षावाची घटना समोर आल्याने नाराजीचाही सूर उमटला आहे.
अर्थात एखाद्या विवाह सोहळ्यात असा पाण्यासारखा पैसा वाया घालवण्याची ही काही पाकिस्तानातील पहिली घटना नाही. असे प्रकार तेथे पूर्वीही घडले आहेत. काही काळापूर्वी गुजरांवाला भागात एका उद्योगपतीच्या मुलाचे लग्न होते. तेव्हाही वऱ्हाडी मंडळींवर नोटांचा नव्हे तर डॉलरचा वर्षाव करण्यात आला होता.