इस्लामाबाद : पाक लष्कराचे हेलिकॉप्टर आज पाक व्याप्त काश्मरमध्ये कोसळून पाक लष्कराचे ५ कर्मचारी ठार झाले. यामध्ये पाक लष्कराच्या दोन अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. एमआय-१७ हे हेलिकॉप्टर आपल्या नियमित प्रशिक्षणार्थींच्या उड्डाणाच्यावेळी तांत्रिक बिघाडामुळे कोसळले, असे पाक लष्कराच्यावतीने सांगण्यात आले. मध्यरात्रीनंतर १ वाजण्याच्या सुमारास दियामेरमधील थाकदास कॅन्टोन्मेंटपासून १२ किलोमीटर अंतरावरील हुदोर गावाजवळ कोसळले. मेजर आतिफ, पायलट इन कमांड; मेजर फैसल, सह-पायलट; नायब सुबेदार मकबूल, फ्लाइट इंजिनिअर; हवालार जहांगीर, क्रू चीफ; आणि नाईक अमीर, क्रू चीफ अशी मरण पावलेल्यांची नावे आहेत. एक हेलिकॉप्टर दियामेर जिल्ह्यातल्या चिलास भागात कोसळले असल्याचे गिलगिट बाल्टीस्तानच्या सरकारचे प्रवक्ते फैजुल्लाह फराक यांनी म्हटले होते. हे हेलिकॉप्टर गिलगिट बाल्टीस्तान सरकारचे होते आणि मरण पावलेले सर्वजणगिलगिट बाल्टीस्तान सरकारशी संबंधित होते, असा अर्थ त्यांच्या वक्तव्यातून काढला जात होता. मात्र थोड्याच वेळात हे हेलिकॉप्टर पाक लष्कराचे होते, असे स्पष्टिकरण पाक लष्कराच्या माध्यमविषयक शाखेने दिले. हेलिकॉप्टर नव्याने प्रस्तावित केलेल्या हेलिपॅडवर लँडिंगची चाचणी घेत होते, असे दियामेर जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधिक्षकक अब्दुल हमिद यांनीही म्हटले आहे.अलिडच्या काळात कोसळलेले हे दुसरे हेलिकॉप्टर आहे. गेल्या महिन्यात खैबर पख्तुनख्वा प्रांतात देखील एक हेलिकॉप्टर कोसळले होते.