बारामती – बारामती तालुक्यात कऱ्हावागज येथील यशोदीप कला क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष रामेश्वरी जाधव (दुफडे) आणि नितीन तानाजी जाधव (दुफडे) यांनी नोकरीच्या देण्याच्या बहाण्याने शेकडो तरुणांची फसवणूक करून लुटलेल्या कोट्यावधी रुपयांच्या मालमत्तेतून उभा केलेल्या शाळा अखेर न्यायालयाच्या आदेशाने जप्त केल्या आहेत. बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या जिगरबाज अधिकाऱ्यांच्या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत (दि. 27) जूनला बारामती तालुका ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. तपास सहायक पोलीस निरीक्षक महेश विधाते यांनी केला आहे. या गुन्ह्यातील आरोपी नितीन जाधव यांचे मूळ नाव नितीन दुफडे, असे आहे.
गाव कोळेगाव (ता. माळशिरस) आहे. बारामतीमध्ये प्रस्थ निर्माण करण्यासाठी नाव बदलून सामाजिक संस्था उभा करायच्या. त्यातून पैसा मिळवायचा, असे धोरण रामेश्वरी आणि नितीन जाधव यांनी आखले होते. अनेक सामाजिक संस्था, खासदार आमदारांनी लाखोंच्या देणग्या दिल्याने जोडप्यानी कोट्यवधींची माया जमवली आहे.
- दीड हजार पानांचे चार्जशीट
हा गुन्हा दाखल झाल्यापासून बारामती तालुक्यात याप्रकरणी पोलीस कारवाई करणार का, असा प्रश्न निर्माण झाला होता. रामेश्वरी जाधव दुफडे यांचे राजकीय लागेबांधे आणि वजन असल्यामुळे कारवाई होईल का नाही, अशी लोकांची कुजबुज होती. परंतु पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या सहकार्याने तपास अधिकारी महेश विधाते यांनी तपास करून तब्बल दीड हजार पानांचे चार्जशीट कोर्टात दाखल केले आहे.