धरणालगतची गावेच तहानलेली; वेल्हे तालुक्‍यात भीषण पाणीटंचाई

शेती आणि पूरक व्यवसायही अडचणीत

वेल्हे- वेल्हे तालुक्‍यात वरसगांव, पानशेत, गुंजवणी अशी तीन धरणे आहेत. परंतु, या तीनही धरणांची पाणी पातळी कमी होऊन ती कोरडी पडायला सुरूवात झाली आहे. यावर्षी पाऊस कमी असल्याने जानेवारी पासूनच पाणीसाठा कमी होऊ लागला. यामुळे आजूबाजूची गावे पाणी टंचाईच्या विळख्यात सापडली आहेत. धरणांलगतची अनेक गावे, वस्त्या धरणांच्या पाण्यावरच अवलंबून आहेत. मात्र, पाणीसाठा कमी होत असल्याने धरणक्षेत्र परिसरातच दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे.

वेल्हे तालुका दुर्गम डोंगरी भागाने वेढलेला आहे. यामुळे येथे उद्योग, व्यवसायांचा अभाव आहे. यातूनच शेती आणि शेतीपुरक व्यवसाय या शिवाय उत्पन्नाचे अन्य साधन नसल्याने शेतीवरच भर दिला जातो. तालुक्‍यात भात शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. परंतु, यंदा पाऊसच झाला नसल्याने अनेक खाचरे कोरडी पडली आहेत.

साळंच निघाली नसल्याने तांदळाच्या मिलही रिकाम्या आहेत. त्यातच, पुरक व्यवसाय म्हणून गाई, म्हैस, शेळ्या, मेंढ्या पाळल्या जात असल्या तरी चारा-पाणी नसल्याने या व्यवसायावरही मर्यादा आल्या आहेत. पशुधन जगविताना शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. यामुळेच काहींनी आपली जनावरे कवडी मोल भावात बाजारात विकली आहेत.

वेल्हे तालुका डोंगर दऱ्याखोऱ्यांच्या सह्याद्रीच्या रांगेत वसलेला आहे. काही वाड्या, वस्त्या उंच डोंगर माथ्यावर आहेत. या ठिकाणी तर पाण्याची भीषण टंचाई आहे. रस्त्यांची सुविधा नसल्यामुळे प्रशासनाला पाण्याचे टॅंकरही अशा ठिकाणी पुरवता येत नसल्याने डोक्‍यावर हंडा घेऊन पाणी नेण्याशिवाय पर्याय नाही. अशा काही वाड्यावस्त्यांवरील ग्रामस्थ या काळात धरणांच्या ठिकाणी येऊन पाल ठोकून राहत आहेत.

जनांवरांच्या पाण्याकरिताही रोज दहा ते पंधरा किमी पायपीट करावी लागत आहे. तालुक्‍यातील रेडेखिंड, दापसरे, चांदसड, खानू येथील बंडेवस्ती, फरताडवस्ती, टाकीवस्ती, माणगांव येथील पिंपळ माळ, हारपुड येथील धनगर वस्ती, माजगांव येथील धनगरवाडा अशा अनेक वस्त्या डोंगराच्या माथ्यावर गेली अनेक वर्षांपासून वसलेल्या आहेत. अशा वस्त्यांना पाण्याचा मोठा प्रश्‍न भेडसावत आहे. जनावरे तहानेने हंबरडा फोडत आहेत. तर, उन्हाचा तडाखा वाढत असल्याने पाण्यासाठी अनेक गावे ओस पडायला लागली आहेत.

“वेल्हे तालुक्‍यातील वाड्या, वस्त्या, गावे यांना दरवर्षी उन्हाळ्यात पाणी प्रश्‍न मोठ्या प्रमाणावर भेडसावत असून गावे ओस पडत आहेत. पाण्याचा प्रश्‍न कायम स्वरूपी कसा सोडवता येईल, याचा प्रशासनाने विचार करायला पाहीजे व येथील पाणी प्रश्‍न सोडविण्याकरिता पाठपुरावा करीत आहे”.
– संतोष कोकरे, सरपंच, टेकपोळे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.