satara | सातार्यात सलग चौथ्या दिवशी वळिवाच्या जोरदार सरी

सातारा (प्रतिनिधी) – सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात सोमवारी वळिवाच्या जोरदार सरी कोसळल्या. सातारा शहरात सलग चौथ्या दिवशी ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. पाऊस आल्यानंतर शहरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. आरटीओ ऑफिस परिसरात झाडाची फांदी रस्त्यावर कोसळून, वाहतूक विस्कळीत झाली होती.
अरबी समुद्रात कमी दाबाचे पट्टे वारंवार तयार होत असल्याने, 16 मेपर्यंत पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला होता. हा अंदाज खरा ठरला असून, जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. गेल्या दीड महिन्यात सातारकरांनी तीव्र उन्हाळा अनुभवला. उकाड्याने नागरिक हैराण झाले होते.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून दुपारनंतर हवामान बदलत आहे. सातारा शहर आणि जिल्ह्यात काही ठिकाणी सलग चार दिवस पाऊस पडत आहे. शहरात सोमवारी दुपारी 4 वाजल्यानंतर वळिवाच्या जोरदार सरी बरसल्या. ढगांच्या गडगडाटात वादळी वार्यासह सायंकाळी उशिरापर्यंत पाऊस पडत होता.
कराड तालुक्यात जोरदार वार्यामुळे काही ठिकाणी घराचे पत्रे उडून गेले. सातारा शहरात आरटीओ परिसरात झाडाची फांदी रस्त्यावर कोसळून, वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. सुदैवाने यात कोणी जखमी झाले नाही. सातारा, कराड, महाबळेश्वर व पाटण तालुक्यात अनेक ठिकाणी वळिवाच्या जोरदार सरी बरसल्या.





