महाराष्ट्रात पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम; ‘या’ भागात ऑरेंज अलर्ट

मुंबई : बंगालच्या उपसागरात तयार होणारी संभाव्य कमी दाबाची प्रणाली महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढवण्यास पूरक ठरत आहे. येत्या पाच दिवसांत राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेषत: कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा प्रभाव राहणार आहे.
आजपासून पावसाला सुरुवात –
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज (गुरुवार) विदर्भातील सर्व जिल्हे, मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, परभणी, तसेच मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पुणे आणि कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
शुक्रवारचा अंदाज –
शुक्रवारी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसेच विदर्भातील सर्व जिल्हे, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे.
शनिवारी कोकणात अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट –
शनिवारी कोकणातील पालघर वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली येथे तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. तर नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. विदर्भातही सर्व जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता आहे.
मॉन्सूनची माघार सुरू –
दरम्यान, मॉन्सूनने बुधवारी काही भागांतून माघार घेतली असून, आज मॉन्सूनच्या परतीची सीमा रामपूर बुशहर, हरिद्वार, मुरादाबाद, इटावा, बांसवाडा, वलाभ, विद्यापीठ नगर आणि वेरावळ या भागांपर्यंत आहे. पुढील दोन दिवसांत मॉन्सून गुजरात, राजस्थान, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीरच्या उर्वरित भागांसह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागांतून माघार घेण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
राज्यातील नागरिकांना पावसामुळे सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. विशेषत: कोकण आणि मराठवाड्यातील अतिजोरदार पावसाच्या शक्यतेमुळे स्थानिक प्रशासनाला सावधगिरी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.





