IAS Sethi Transferred : राज्यावर अतिवृष्टीचे संकट असताना एक मोठी बातमी समोर आल्याने मोठी चर्चा होत आहे. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिव सोनिया सेठींची बदली करण्यात आली आहे. त्यांची अचानक बदली करण्यात आल्याने उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सेठींना बेस्टच्या महाव्यवस्थापकीय पदावर नियुक्त मिळाली आहे. मराठवाडा, विदर्भ, सोलापूरसह महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले आहे. दोन दिवस उघडीप घेतल्याने आज पुन्हा पावसाने जोर धरला असून पुढच्या तीन दिवसांत पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्यासाठी पुनर्वसन विभाग महत्वाची भूमिका बजावत असतो. मात्र, अतिवृष्टीच्या काळात पुनर्वसन विभागाच्या अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले असून, विरोधकांकडून अनेक सवाल विचारले जात आहेत. आपत्तीच्या काळातच सोनिया सेठींची बदली केल्याने त्यांच्या बदलीवर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाच्या कार्याची गरज असताना ही बदली कितपत योग्य आहे? का ती शिक्षा आहे? जनता अत्यंत कठीण अवस्थेत असताना विभागात नेतृत्व बदल केल्याने अफरातफरीचे वातावरण निर्माण होणार नाही का? नवीन अधिकाऱ्याला विभागाचे काम समजून घेण्यासाठी वेळ लागणार नाही का? असे सवाल उपस्थित करत प्रशासन योग्य पध्दतीने चालले नाही याचे हे उदाहरण आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी केली आहे. हेही वाचा : करीना कपूरची ‘क्रू २’ साठी समंती; पुन्हा त्रिकुट एकत्र येणार?